पुणे शहरावर आता राहणार २४०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा 'कडक वॉच' : अमिताभ गुप्ता यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 22:13 IST2020-10-19T22:08:57+5:302020-10-19T22:13:00+5:30
पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरात सर्वप्रथम १२३४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते.

पुणे शहरावर आता राहणार २४०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा 'कडक वॉच' : अमिताभ गुप्ता यांची माहिती
पुणे : शहरात सीसीटीव्हीचे जाळे वाढविण्यास शासनाची परवानगी मिळाली असून आता नव्याने १४०६ सीसीटीव्हीपुणे शहरात बसविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.
पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरात सर्वप्रथम १२३४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय स्वतंत्र झाल्यावर पुणे शहरात जवळपास १ हजार कॅमरे राहिले होते. राज्यात सर्वप्रथम सीसीटीव्हीची योजना पुण्यात राबविली गेली असल्याने तेव्हाचे तंत्रज्ञान आता जुने झाले आहेत. तसेच अनेक कॅमेऱ्यांची क्षमता संपली आहे.त्यामुळे आणखी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. जुने कॅमेरे बदलून तसेच नवीन १४०६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास मंजुरी मिळाली असून हे काम जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
वाहतूक, आर्थिक गुन्हे शाखेची पूर्नरचना
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हे शाखेची पुर्नरचना केल्यानंतर आता वाहतूक आणि आर्थिक गुन्हे शाखेची पुर्नरचना केली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके या काम पाहत आहेत. आर्थिक गुन्हे शाखेची झोननुसार युनिट राहणार आहेत. त्यानुसार नियमावली तयार करण्यात आली आहे़ पूर्वी ५० लाख रुपयांच्या पुढील गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जात होता. आता ३ कोटींच्या फसवणुकीचे गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येणार आहे.
वाहतूक शाखेत आता ३ झोन
वाहतूक शाखेच्या पूर्नरचनेत तीन झोन आणि नियंत्रण कार्यालय अशी रचना करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे अधिपत्याखाली साऊथ झोन, नॉर्थ झोन (मेट्रो), ईस्ट झोन अशी विभागणी असणार आहे.तीन झोनला प्रत्येकी एक सहायक पोलीस आयुक्त कामकाज पाहणार आहेत़
तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाईसाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व गोष्टी प्रत्यक्षात उतरविण्याच्या कामाला सुरुवात झाली असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.