पुणे शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; दिवसात सरासरी ८१ जणांना चावा, संख्या रोखण्याचे पालिकेसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 14:56 IST2025-04-30T14:55:32+5:302025-04-30T14:56:36+5:30

सकाळी फिरायला जाणारे नागरिक, घराबाहेर, सोसायटीत खेळणारी मुलं, रात्री उशिरा दुचाकीवर प्रवास करणाऱ्या नागरिकांवर या भटक्या कुत्र्यांकडून होणार हल्ले वाढले आहेत

Stray dogs rampant in Pune city; On average, 81 people are bitten per day, the challenge before the municipality is to control the number | पुणे शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; दिवसात सरासरी ८१ जणांना चावा, संख्या रोखण्याचे पालिकेसमोर आव्हान

पुणे शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; दिवसात सरासरी ८१ जणांना चावा, संख्या रोखण्याचे पालिकेसमोर आव्हान

पुणे : शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, त्यांची संख्या दीड लाखाच्या पुढे आहे. मात्र, महापालिका दरवर्षी केवळ काही हजारांत कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करू शकते. कुत्र्यांच्या वाढीच्या वेगाच्या तुलनेत हे प्रमाण फारच तोकडे असल्याने त्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यात पालिका पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी मॉडेल कॉलनीतील चित्तरंजन वाटिका परिसरात एका भटक्या श्वानाने अचानक हल्ला केल्याने नरेंद्र शेरबहादूर बिस्ता हा अवघ्या सात वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. कुत्र्याने चावा घेतल्याने मुलाचा डावा गाल पूर्णपणे वेगळा झाला होता. नातेवाइकांनी तातडीने मुलाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारांची गरज पाहता त्याला मोठ्या रुग्णालयात हलवावे लागले.

महापालिकेच्या म्हणण्यानुसार भटक्या कुत्र्यांची संख्या २०२३ च्या आकडेवारी नुसार १ लाख ८९ हजारांच्या आसपास होती. नव्याने महापालिकेत समाविष्ट गावांमुळे ही संख्या २ लाख २५ हजारांपर्यंत गेली आहे; तर स्वयंसेवी संस्थांच्या म्हणण्यानुसार ती संख्या अडीच ते तीन लाखांच्या दरम्यान आहे. यावर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी नसबंदीच्या शस्त्रक्रियेची मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. शहरात जानेवारी ते डिसेंबर २०२४ पर्यंत २५ हजार ८९९ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे आरोग्य विभागाकडील आकडेवारी दर्शविते आहे. चालू वर्षात जानेवारीमध्ये २७०९, फेब्रुवारी २३०९, मार्च महिन्यात २३५९ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे. सुदैवाने रेबीज या महाभयंकर रोगाने अजून तरी डोके वर काढलेले नसले तरी, कुत्रे चावण्याच्या या मोठ्या प्रमाणाकडे पाहता भविष्यात या रोगाचे रुग्ण दिसू शकतील, अशी भीती व्यक्त होते.

सकाळी फिरायला जाणारे नागरिक, घराबाहेर, सोसायटीत खेळणारी मुलं, रात्री उशिरा दुचाकीवर प्रवास करणाऱ्या नागरिकांवर या भटक्या कुत्र्यांकडून होणार हल्ले वाढले आहेत; तसेच काही भागात टोळीने राहणारी ही भटकी कुत्री रात्रीच्या वेळी प्रचंड मोठ्या व विचित्र आवाजात विव्हळल्याने नागरिकांच्या झोपा उडाल्या आहेत. शहराचा वाढता विस्तार, रस्त्यावर टाकला जाणार कचरा, या भटक्या कुत्र्यांवर प्रेम करून त्यांना खाऊ घालणारे नागरिक यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढण्यात भर पडत आहे.

महिन्यात २ हजारांपेक्षा अधिक जणांना कुत्र्यांचा चावा

शहरात दर महिन्याला दोन हजार ते एकवीसशे नागरिकांना कुत्री चावल्याच्या घटना घडत असल्याचे पालिकेकडील आकडेवारीनुसार निदर्शनास आले आहे. ब्ल्यू क्रॉस सोसायटी, सोसायटी फॉर प्रोटेक्शन, पीपल्स फॉर ॲनिमल, सोसायटी फॉर प्रीव्हेशन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स आदी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने पालिकेचे आरोग्य कर्मचारी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करतात. कुत्रा बंदोबस्त विभागामार्फत भटक्या आणि मोकाट कुत्र्यांवर कारवाई केली जाते. जाळीच्या साहाय्याने पकडून कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करून रेबीज प्रतिबंधात्मक लस देण्यात येते. कायद्यानुसार त्यांना पुन्हा पकडलेल्या ठिकाणीच सोडण्यात येते.

भटक्या कुत्र्यांची संख्या रोखणे आव्हानात्मक

भटक्या कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यासाठी दरवर्षी निधी मंजूर होतो. त्या माध्यमातून दरवर्षी २० हजार कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करणे शक्य होते. या वर्षात ४० ते ५० हजार कुत्र्यांची नसबंदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हजार प्रत्येक कुत्र्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी १५००ते १६५० रुपये खर्च येतो. दरवर्षी रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवली जाते. त्यासाठी पालिका स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेते. शहराचा वाढता विस्तार पाहता भटक्या कुत्र्यांची संख्या रोखणे हे आव्हान आहे. पुणे शहर रेबीजमुक्त ठेवण्याचा प्रयत्न आहे. - डॉ. सारिका फुंडे, पशुवैद्यकीय अधिकारी, पुणे महापालिका

Web Title: Stray dogs rampant in Pune city; On average, 81 people are bitten per day, the challenge before the municipality is to control the number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.