आरोग्य विभागाचा 'अजब' कारभार; परीक्षेत उमेदवारांना 'पात्र' ठरवले अन् प्रत्यक्षात मात्र डावलले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 02:59 PM2021-04-22T14:59:36+5:302021-04-22T15:00:11+5:30

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने विविध पदांच्या ५०० च्यावर जागांसाठी भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली होती.

'Strange' management of the health department; Candidates were declared eligible in the examination and were actually disqualified | आरोग्य विभागाचा 'अजब' कारभार; परीक्षेत उमेदवारांना 'पात्र' ठरवले अन् प्रत्यक्षात मात्र डावलले

आरोग्य विभागाचा 'अजब' कारभार; परीक्षेत उमेदवारांना 'पात्र' ठरवले अन् प्रत्यक्षात मात्र डावलले

Next

पुणे: राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने २८ फेब्रुवारी २०२१ रोजी सिनियर क्लार्क, लॅब टेक्निशियन, नर्सेस यासारख्या विविध पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल १९ एप्रिलला जाहीर करण्यात आला तसेच पात्र उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आज (दि.२२) पुण्यात बोलावले होते. मात्र प्रत्यक्ष ठिकाणी पात्र उमेदवारांऐवजी वेगळ्याच उमेदवारांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे यादीत नाव न आलेल्या पात्र उमेदवारांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. 

राज्य सरकारच्याआरोग्य विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या विविध पदांच्या जवळपास ५०० च्यावर जागांसाठी भरतीची जाहिरात काढण्यात आली होती. त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून उमेदवारांनी २८ फेब्रुवारी २०२१ रोजी परीक्षा दिली होती. त्याचा निकाल १९ एप्रिलला जाहीर झाला. त्यात उत्तीर्ण व पात्र उमेदवारांची नावे वेबसाईटवर जाहीर करण्यात आली होती. तसेच त्यांना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी पुण्यातील आरोग्य विभागाच्या कार्यालयात बोलवण्यात आले होते. त्यामुळे परिसरात उमेदवारांची एकच गर्दी जमा झाली होती. मात्र,आज ज्या पात्र मंडळींना बोलावण्यात आले होते ते तिथे पोहचल्यावर  भलतीच नावे प्रसिद्ध झाली होती. त्या उमेदवारांमध्ये यवतमाळ, नांदेड, अमरावती, औरंगाबाद अशा विविध ठिकाणाहून आलेल्यांची संख्या मोठी होती. या आरोग्य विभागाच्या सावळ्या गोंधळावर संतप्त उमेदवारांनी तीव्र रोष व्यक्त केला. यासंबंधी आरोग्य विभागाच्या उपसंचालकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

एक उमेदवार महिला म्हणाली, सिनियर क्लार्क पदासाठी एनटी विभागातून मी परीक्षा दिली होती. त्यात मला १४८ गुण मिळाले आहे. मात्र आता इथे आल्यावर समजले की विभागाने ती जागाच घेतलेली नाही. जर तुम्हाला ५० टक्के जागांचीच भरती करायची होती तर त्याचवेळी हॉल तिकीट वगैरे रद्द देणे गरजेचे नव्हते. ऐनवेळी जागाच रद्द केल्यामुळे सर्वच मेहनत वाया गेली.त्यात मानसिक त्रास पण सहन करावा लागत आहे.

गणेश क्षीरसागर म्हणाला, अनुसुचित जाती प्रवर्गातून आरोग्य विभागाच्या निघालेल्या पदासाठी परीक्षा दिली होती.मात्र जाहीर करण्यात आलेल्या अंतिम यादीत सर्वाधिक गुण असून देखील मला डावलले गेले आहे. व माझ्या जागी ६६ गुण असलेल्या व्यक्तीचे नाव नमूद करण्यात आले आहे. या निवडीवर माझा तीव्र आक्षेप आहे.

याबाबत श्रीकांत देशपांडे म्हणाले, माझ्या पत्नीने लॅब टेक्निशियन पदासाठी परीक्षा दिली होती. त्यात तिला ११२ गुण मिळाले आहे. तिला कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी आज आरोग्य विभागाच्या कार्यालयात बोलावले होते. मात्र तिथे गेल्यावर तिचे नावच नसल्याचे निदर्शनास आले. तसेच तिथे चौकशी केल्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

Web Title: 'Strange' management of the health department; Candidates were declared eligible in the examination and were actually disqualified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.