मोदीखान्यात स्टोव्हचा भडका

By Admin | Updated: August 4, 2015 03:27 IST2015-08-04T03:27:38+5:302015-08-04T03:27:38+5:30

स्वयंपाक करीत असताना स्टोव्हचा भडका उडाल्याने पती-पत्नी भाजल्याची घटना सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास लष्कर भागात असलेल्या मोदीखान्यातील

Stove breaks in Modi Market | मोदीखान्यात स्टोव्हचा भडका

मोदीखान्यात स्टोव्हचा भडका

पुणे : स्वयंपाक करीत असताना स्टोव्हचा भडका उडाल्याने पती-पत्नी भाजल्याची घटना सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास लष्कर भागात असलेल्या मोदीखान्यातील कुंभार बावडी येथे घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीमध्ये तीन घरांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती केंद्रप्रमुख रवींद्र आढाव यांनी दिली.
किसन बनसोडे आणि शकुंतला बनसोडे अशी भाजलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. बनसोडे या घरामध्ये स्वयंपाक करीत असताना त्यांच्या स्टोव्हचा अचानक भडका उडाला. काही क्षणांतच घरातील साहित्याने आग पकडली. जीव वाचवण्यासाठी दोघेही जखमी अवस्थेत बाहेर पळाले. त्यांच्या शेजारच्या आणखी दोन घरांनीही पेट घेतला होता. नागरिकांनी तातडीने अग्निशामक दलाला दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यानुसार लष्कर केंद्राचे जवान बंबासह अवघ्या तीनच मिनिटांत घटनास्थळी धावले. किसन बनसोडे यांच्या तोंडाला तसेच हाताला भाजले आहे. तर शकुंतला या किरकोळ भाजल्या आहेत. आगीमध्ये जळालेली तीनही घरे कौलारू छपराची असून पत्र्याची आहेत. या आगीमध्ये तीनही घरांचे छप्पर, घरातील टीव्ही, फ्रीज, कपडे व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Stove breaks in Modi Market