चोरट्यांच्या तावडीतून आता मेडिकलची दुकानेही सुटेना, तब्बल १० लाखांची औषधे चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 19:09 IST2018-05-31T19:09:38+5:302018-05-31T19:09:38+5:30
चोरट्यांच्या नजरेतून आता मेडिकलची दुकाने सुटणार नाही याची जणू खात्री देणारी घटना हडपसरमध्ये घडली आहे.

चोरट्यांच्या तावडीतून आता मेडिकलची दुकानेही सुटेना, तब्बल १० लाखांची औषधे चोरीला
पुणे : हडपसरमध्ये मेडिकलच्या खिडकीची काच फोडून दुकानातील १० लाख १९ हजार रुपयांची औषधे चोरल्याची घटना घडली. शंकर महाराज मठाजवळ असलेल्या शिवम कॉम्प्लेक्समधील मेडिकलमध्ये २८ मेच्या रात्री हा प्रकार घडला.
याप्रकरणी अपेक्षित अनिल नावंदर (वय ३०, रा. हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी याचे हडपसरमधील शंकर महाराज मठाजवळील शिवम कॉम्प्लेक्समध्ये मेडिकल आहे. २८ मेला रात्री चोरट्यांनी फिर्यादी यांच्या दुकानाची ग्रील नसलेल्या खिडकीची काच फोडली व आत घुसले. चोरट्यांनी एकूण दहा प्रकारची औषधे चोरली असून त्यांची किंमत १० लाख १९ हजार ३६६ रुपये आहे. ही सर्व औषधे महागडी आहेत. २९ मेला सकाळी सुरक्षारक्षकाला चोरी झाल्याचे समजताच त्याने फिर्यादी यांना फोनद्वारे माहिती दिली. त्यानुसार नावंदर यांनी फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे करत आहे.