तालकटोरा येथे शूरवीर मराठ्यांचे पुतळे उभारा; सरहदची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By श्रीकिशन काळे | Updated: February 28, 2025 15:56 IST2025-02-28T15:55:19+5:302025-02-28T15:56:35+5:30
थोरले बाजीराव पेशवे, सुभेदार मल्हारराव होळकर आणि महादजी शिंदे यांचे अर्धाकृती पुतळे उभे करावेत

तालकटोरा येथे शूरवीर मराठ्यांचे पुतळे उभारा; सरहदची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पुणे : ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये नुकतेच झाले. ते ठिकाण ऐतिहासिक असल्याने तिथे थोरले बाजीराव पेशवे, सुभेदार मल्हारराव होळकर आणि महादजी शिंदे यांचे अर्धाकृती पुतळे उभे करावेत, अशी मागणी सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली.
तालकटोरा स्टेडियम या जागेला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. याच ठिकाणी मराठ्यांनी तळ ठोकलेला होता. त्या ठिकाणी मराठ्यांचे रक्त सांडलेले आहे. संमेलनस्थळी मराठी माणूस आला आणि त्याने तेथील मातीदेखील कपाळाला लावली. त्यामुळे या पावनभूमीमध्ये मराठ्यांच्या थोर सेनानींचे पुतळे असणे आवश्यक आहे. त्यासाठी हे पुतळे बनवून देण्याची जबाबदारी सरहद संस्था घेणार आहे. त्यासाठी कोणताही खर्च सरकारला करावा लागणार नाही. मात्र, पुतळे तेथे उभारण्यासाठी दिल्ली सरकार, तसेच केंद्र सरकारच्या संबंधित खात्याशी आपण पत्रव्यवहार करून परवानगी मिळविणे आवश्यक आहे. याला परवानगी मिळाल्यास जगत्विख्यात शिल्पकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली हे पुतळे बनविण्याची कल्पना आहे. यासाठी आपण लक्ष घालावे, अशी विनंती करणारे पत्र संजय नहार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. उपमुख्यमंत्र्यांनाही पत्र दिले आहे.