चाकण : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.५) रात्री खराबवाडी (ता. खेड) येथे घडली. याप्रकरणी एका महिलेने महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सचिन रामआसरे यादव (वय २३, मूळ रा. अलाहाबाद, उत्तर प्रदेश, सध्या रा. चाकण, ता. खेड) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन यादव हा त्याची पत्नी गॅलरीत उभे राहून इतर पुरुषांकडे पाहत असल्याचा संशय घेत होता. यावरून तो पत्नीला सतत भांडण करून मारहाण करायचा. घटनेच्या दिवशी त्याने दिवसभर भांडण केले आणि सायंकाळी पत्नीला प्लास्टिकचे स्टूल, लाकडी बेलणे, पीव्हीसी पाइप आणि काठीने दोन्ही पाय, दोन्ही हात आणि डोक्यावर मारहाण केली, तसेच पत्नीच्या पोटात चाकू लावून जिवे मारण्याची धमकी दिली आणि तिला मारून टाकले. जेव्हा मुलगा प्रिन्स आणि मुलगी पलक यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनाही दमदाटी केली आणि मुलाला पाठीत लाकडी बेलण्याने मारले. महाळुंगे एमआयडीसी पोलिस पुढील तपास करीत आहेत.