पुणे : घरी जाणाऱ्या तरुणाला अडवून सिगारेटसाठी पैसे मागितले. परंतु, त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने टोळक्याने त्याच्यावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी तिघांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
मंगेश रवींद्र जाधव (वय २०, रा. रामटेकडी, हडपसर) आणि आयुशे रवींद्र काळे (वय २२, रा. ब्रम्हा अव्हेन्यू सोसायटी, शिवनेरीनगर, कोंढवा) यांना अटक केली असून महेश शिंदे (रा. रामटेकडी, हडपसर) याच्यावर गुन्हा दखल केला आहे. रोहित सिद्धार्थ शिवशरण (वय २७, रा. आदिनाथ सोसायटीचे आवारात, रामटेकडी, हडपसर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सिद्धार्थ विठ्ठोबा शिवशरण (वय ६०) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार अदिनाथ सोसायटीचे आवारात शनिवारी रात्री साडेनऊ वाजता घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित शिवशरण हा त्याच्या बहिणीच्या घरातून धुतलेले कपडे घेऊन घरी येत होता. वाटेत आरोपींनी त्याला अडवून सिगारेटसाठी पैसे मागितले. त्याने पैसे न दिल्याने त्यांनी रोहित यांच्या डोक्यात, कमरेवर, पाठीत कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. रोहित याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून सहायक पोलीस निरीक्षक राहुल गिरमकर तपास करीत आहेत.