पायावरून गेले एसटीचे चाक; ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी, स्वारगेट आगारातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 20:03 IST2025-11-06T20:03:22+5:302025-11-06T20:03:51+5:30
गाडीचा चालक बस मागे घेत असताना ज्येष्ठ नागरिकाला बसची धडक बसून ते खाली पडले आणि चाक त्यांच्या पायावरून गेले. नागरिकांनी आरडा-ओरड केल्यावर चालकाने ब्रेक दाबला

पायावरून गेले एसटीचे चाक; ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी, स्वारगेट आगारातील घटना
पुणे : स्वारगेट बसस्थानकात एसटी मागे घेत असताना ज्येष्ठ नागरिकाला बसची धडक बसून, बसचे चाक प्रवाशाच्या पायावरून गेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी संध्याकाळी साडेपाचच्या वाजता घडली. या घटनेत प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शिवाजी बाबूराव कानडे (वय ६५, रा. बारामती) असे ज्येष्ठ नागरिक प्रवाशाचे नाव आहे. गंभीर जखमी झालेले शिवाजी कानडे फलटण-मुंबई गाडीने प्रवास करत असताना बस स्वारगेट एसटी आगारात आली. लघुशंकेसाठी ते गाडीतून खाली उतरले. त्याचवेळी फलटण-लातूर गाडीचा चालक बस मागे घेत असताना कानडे यांना बसची धडक बसून ते खाली पडले आणि बसचे चाक त्यांच्या पायावरून गेले. नागरिकांनी आरडा-ओरड केल्यावर चालकाने ब्रेक दाबला. मात्र, तोपर्यंत प्रवाशाचा पायावरून गाडीचे चाक गेले आणि गंभीर दुखापत झाली. आगारातील सहप्रवाशी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ जखमी प्रवाशाला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून, अपघात कसा घडला हे सीसीटीव्हीमध्ये तपासण्यात येत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.