चंपासष्टीला एसटीला मिळाले सात लाखांचे उत्पन्न; दहा हजार प्रवाशांनी केला प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 15:36 IST2024-12-23T15:36:23+5:302024-12-23T15:36:49+5:30
गतवर्षी २०२३ मध्ये ९४ जादा गाड्या सोडण्यात आल्या. त्यामधून एसटीला २ लाख ७९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते

चंपासष्टीला एसटीला मिळाले सात लाखांचे उत्पन्न; दहा हजार प्रवाशांनी केला प्रवास
पुणे : श्रीक्षेत्र जेजुरी गडावर चंपाषष्टीनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी पुणे एसटी विभागाकडून सर्व आगारातून बससेवा देण्यात आली. सात दिवसांच्या या सेवेतून एसटीला सात लाखांचे उत्पन्न मिळाले, तर जवळपास दहा हजार प्रवाशांनी या विशेष सेवेचा लाभ घेतला.
चंपाषष्टीला श्रीक्षेत्र जेजुरी गडावर पुणे जिल्ह्यासह राज्याच्या काेनाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात. या भाविकांना पुणे शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर यासह पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या अन्य आगारातून जेजुरी गडावर जाण्यासाठी एसटीकडून जादा बसचे नियोजन करण्यात आले होते. गतवर्षी २०२३ मध्ये ९४ जादा गाड्या सोडण्यात आल्या. त्यामधून एसटीला २ लाख ७९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले, तर २०२४ मध्ये प्रवाशांची गर्दी लक्षात घेता ३८ जादा गाड्यांच्या माध्यमातून २०८ फेऱ्या केल्या. त्यातून एसटीला सात लाखांचे उत्पन्न मिळाले, अशी माहिती एसटी प्रशासन विभागाकडून देण्यात आली.
दरम्यान, पौराणिक काळात ऋषी मुनींना त्रास देणाऱ्या मणी व मल्ल दैत्यांचा संहार करण्यासाठी महादेवाने मल्हारी मार्तंडाचा अवतार धारण करून चंपाषष्ठीच्या दिवशी दैत्यांचा वध करून विजय मिळवला. हे युद्ध मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठीपर्यंत ६ दिवस चालले होते. तेव्हापासून या सहा दिवसांत खंडोबा गडावर विजयोत्सव साजरा केला जातो.