लाेकमत न्यूज नेटवर्क, पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या परीक्षेच्या निकाल मंगळवारी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल दुपारी एक वाजता ऑनलाइन पाहता येणार आहे.
इयत्ता दहावी हा शैक्षणिक वाटचालीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असला तरी कमी गुण मिळाले किंवा नापास झालात तर सर्वस्व गमावले असे मात्र अजिबात नाही. दहावी नापास होऊनही पुन्हा परीक्षा देऊन पुढचे शैक्षणिक करिअर यशस्वीरीत्या पार करून यशाच्या शिखरावर पोहोचल्याची अनेक उदाहरणे आपल्या आसपास असतात. त्यामुळे निकाल मनासारखा लागला नाही म्हणून खचून जाऊ नका, भरारी घेण्याची संधी समजून नव्या जोमाने अभ्यास करून पुन्हा परीक्षेला सामोरे जा, असा सल्ला शैक्षणिक समुपदेशकांनी दिला आहे.
असा पहा निकाल : विद्यार्थ्यांनाे, सर्वप्रथम शिक्षण मंडळाकडून निकाल प्रसिद्ध केलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जा. तिथे गेल्यावर ‘SSC Examination Result 2025’ या लिंकवर क्लिक करा. समोर दिसणाऱ्या रकान्यात आपला सीट नंबर आणि आईचे पहिले नाव टाका. त्यानंतर ‘Submit’ बटणवर क्लिक करा.
८,६४,१२० मुले ७,४७,४७१ मुली १९ तृतीयपंथी परीक्षा केंद्रे २३,४९२
किती मार्क्स मिळतील, याची कल्पना तुम्हाला आहेच... वास्तव स्वीकारा - डाॅ. उल्हास लुकतुके, ज्येष्ठ मानसाेपचार तज्ज्ञ
विद्यार्थ्यांनाे, छापील निकाल जाहीर हाेणं, ते हाती येणं यात नवीन काहीच नाही. तुम्ही पेपर साेडवून वर्गातून बाहेर आलात त्याच दिवशी तुम्हाला निकाल काय येऊ शकताे, याचा अंदाज आलेला असेल. त्यामुळे ज्यांनी वास्तव स्वीकारलेलं असतं त्यांना निकालाचा अंदाज आधीच आलेला असताे. अशा विद्यार्थ्यांना निकालाची धाकधूक वाटत नाही. तरीही, आज निकाल जाे लागेल ताे लागेल. त्यातील वास्तव स्वीकारा. खाेटी स्वप्नं, भाबडी अपेक्षा बाळगणे म्हणजे मूर्खाच्या नंदनवनात जगण्यासारखे हाेईल. तेव्हा स-कारण (रॅशनल) विचार करायला शिका.
दरवर्षीपेक्षा दहा दिवस आधी परीक्षेचे नियोजन केले हाेते. त्यामुळे निकालही लवकर जाहीर होत आहे. शरद गोसावी, राज्य मंडळाचे अध्यक्ष
येथे पाहा निकाल (अधिकृत संकेतस्थळ) https://results.digilocker.gov.in https://mahahsscboard.in http://sscresult.mkcl.org शाळांसाठी https://mahahsscboard.in (in school login)