राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील मागचे विक्रम मोडत राज्याला प्रथम आणा : गिरीश महाजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 12:32 IST2022-09-23T21:28:01+5:302022-09-24T12:32:09+5:30
३४ क्रीडा प्रकारांत राज्याचा सहभाग

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील मागचे विक्रम मोडत राज्याला प्रथम आणा : गिरीश महाजन
पुणे : “राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या बळावर मागचे विक्रम मोडत राज्याला प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत,” असे आवाहन राज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी केले.
गुजरात येथे सुरू झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या वेळी आमदार महेश लांडगे, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर, खजिनदार धनंजय भोसले, क्रीडा सहसंचालक चंद्रकांत कांबळे उपस्थित होते.
महाजन म्हणाले, “प्रशिक्षक, संघटक, व्यवस्थापक आणि खेळाडूंनी मित्रत्वाच्या भावनेने एकत्रीतपणे उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रयत्न करावे. खेळाडूंना चांगल्या कामगिरीसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.” खेळाडूंचा भोजन भत्ता वाढवून २०० ऐवजी ४८० करण्यात आला आहे. गावपातळीवर चांगल्या सुविधा असाव्यात यासाठीही प्रयत्न करावे लागणार आहेत. खेळाडूंनी शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष द्यावे आणि व्यसनापासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
३४ क्रीडा प्रकारांत राज्याचा सहभाग-
३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ३४ क्रीडा प्रकारात महाराष्ट्राचे ७०० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. ध्यानचंद पुरस्कारार्थी प्रदीप गंधे हे पथकाचे नेतृत्व करत असून बॅडमिंटन खेळाडू चिराग शेट्टी आणि कबड्डी खेळाडू सोनाली शिंगटे यांच्या ध्वजधारक संचलनात पथकाच्या अग्रभागी असतील. या स्पर्धेतील काही स्पर्धांना उद्घाटनापूर्वीच सुरुवात झाली आहे. यामध्ये टेबल टेनिसचा समावेश आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी पदके मिळवली आहेत. महाराष्ट्राचा महिला संघ रौप्य तर पुरुष संघाला कांस्य पदकाचा मानकरी ठरला.