Special Report : पुणेकरांना परदेशात जाण्यासाठी जावे लागते दुसऱ्या राज्यात;थेट विमानसेवा कधी होणार सुरु ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 15:46 IST2025-03-19T15:43:23+5:302025-03-19T15:46:11+5:30
केवळ दुबई, सिंगापूर, बँकाॅकसाठीच पुण्यातून थेट विमानसेवा

Special Report : पुणेकरांना परदेशात जाण्यासाठी जावे लागते दुसऱ्या राज्यात;थेट विमानसेवा कधी होणार सुरु ?
- अंबादास गवंडी
पुणे : लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुबई, सिंगापूर आणि बँकाॅक या तीनच ठिकाणी थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू आहे. परंतु, पुण्यातून अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोप देशात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे पुणेकरांना मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई आणि दिल्ली या शहरातील विमानतळांचा आधार घ्यावा लागतो. यामुळे पुण्यातून जाण्यासाठी ‘कनेक्टिंग फ्लाइट’ला प्राधान्य देण्यात येत आहे.
लोहगाव येथील नवीन टर्मिनल सुरू झाले तेव्हा आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढविण्यात येणार आहेत, यासाठी प्रक्रिया सुरू आहे, असे वारंवार विमान प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. परंतु, टर्मिनल सुरू होऊन आठ ते नऊ महिने झाले, तरीही केवळ तीनच आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू आहेत. त्याचा फटका पुणेकर प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे पुण्यातून दैनंदिन १५०० ते २००० प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई आणि दिल्ली या शहरांत जातात. त्यामुळे आर्थिक भारासह मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
शिवाय पुण्यात जर्मनी, युरोप, फ्रान्स, इटली आणि स्वीडनसह अन्य देशातील आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. त्यामुळे पुण्यात येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र टेक ऑफ करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानांची संख्या मर्यादित आहे. शिवाय जी विमान सेवा सुरू आहे, त्यातही काही वेळा उशीर वा विमानच रद्द करण्यात होते. त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतो.
थेट आंतरराष्ट्रीय सेवा आवश्यक
पुण्यातून दुबई, बँकाॅक आणि सिंगापूरसाठीच तीन आंतरराष्ट्रीय फ्लाइट आहेत. दुबईतून युरोप आणि अमेरिकेत प्रवास करता येऊ शकतो. त्यासाठी दुबई येथून त्याच विमान कंपनीची सेवा असल्यास फायदा होतो; अन्यथा दुबईत गेल्यानंतर प्रवाशांचा कस्टम, इमिग्रेशनसाठी खूप वेळ जातो. त्यामुळे पुण्यातून थेट आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती ट्रॅव्हल्स कंपन्यांनी दिली.
पुण्यातील आंतरराष्ट्रीय उड्डाणे : सिंगापूर, दुबई आणि बँकाॅक
परदेश प्रवास कशासाठी?
नोकरी, व्यवसाय, शिक्षण, पर्यटन आणि उद्योग
या देशाला पुणेकरांची पसंती : अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप, जपान
प्रवासासाठी या शहरांना प्राधान्य : मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, चैन्नई आणि दिल्ली
असा लागतो वेळ : (तिकीट दर २७ जून २०२५)
शहर - वेळ (सरासरी) - तिकीट दर (सरासरी)
पुणे - मेलबर्न - २३ तास - ५८ हजार
मुंबई - मेलबर्न - १५ तास - ४० हजार
मुंबई - वॉशिंग्टन - २४ तास - ६५ हजार
पुणे - वॉशिंग्टन - २९ तास- ८० हजार
मुंबई - लंडन - ११ तास - ३० हजार
पुणे - लंडन - १८ तास - ४५ हजार
युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन, जपान येथे नियमित प्रवास करणारा फार मोठा प्रवासी वर्ग पुण्यात व पश्चिम महाराष्ट्रात आहे. पुणे विमानतळाच्या मर्यादांमुळे लांब पल्ल्याची थेट उड्डाणे पुण्यातून शक्य नाहीत. त्यामुळे प्रवाशांना अधिक वेळ, श्रम व पैसे खर्च करावे लागतात. मुंबई विमानतळ मार्गेदेखील मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय प्रवासी पुणे व पश्चिम महाराष्ट्रातून जात असतात. जड बॅगा घेऊन मध्यरात्री फ्लाईट्स पकडण्यासाठी एक्स्प्रेस-वेवरून प्रवास करावा लागतो. यासाठी पुणे विमानतळ प्रशासनाने बंद झालेली पुणे-मुंबई विमान सेवा सुरू केल्यास प्रवाशांना दिलासा मिळू शकेल. लांब पल्ल्याची थेट आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होण्यासाठी २०२९ पर्यंत तरी पुरंदर विमानतळ तयार होणे अत्यंत गरजेचे आहे. - धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ