बारामती: माळेगाव कारखान्याबाबत खुप सगळे प्रयत्न केले. मात्र काहींचे स्वभाव हट्टी आहेत. मी पण हट्टी, डबल हट्टी आहे. अरे बाबा थांबाना कुठेतरी. आपल्या वयाचा विचार करुन, इतर नवीन युवकांना संधी कधी मिळणार, निवडुन येऊन देखील काही जण अडीच वर्षे तर काही जण पाच वर्षे बोर्ड मिटींगला फिरकलेही नाही, हिच कारखान्याविषयी आपुलकी होती का,अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुशिष्यांवर शरसंधान साधत ‘माळेगांव’च्या निवडणुकीत शड्डु ठोकला. यावेळी पवार यांनी स्वतंत्र पॅनल उभारण्याची घोषणा केली.
माळेगांव कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बारामतीत आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते. यावेळी पवार पुढे म्हणाले, ‘माळेगाव’ मध्ये काहींच्या काहीबाबत चुका झाल्या. मी करताना चुका मान्य करणारा कार्यकर्ता आहे. ‘छत्रपती’ला पुर्ण पॅनल नविन केला. याच धर्तीवर ‘माळेगाव’ ला देखील बदल करण्याचे सुतोवाच पवार यांनी केले. मी तुम्हाला शब्द देतो. माझ्यासमोर ज्यांना लढायचं त्यांना लढु द्या, ज्यांना पॅनल करायचं त्यांना करु द्या. माझी हरकत नाही. मी देखील लढणार, पॅनल करणारं आहे. समोरच्याला तुल्यबळ समजून लढणार. मला ही एकदाचं बघायच आहे की काय होतंय ते, असा इशारा पवार यांनी विरोधकांना दिला. कारखान्याची निवडणूक लढविताना आमच्या पॅनेलमध्ये फक्त राष्ट्रवादीचेच उमेदवार नसतील. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ते लोक माझ्याबरोबर नसतील, तरी चालेल. चांगले काम करणाऱ्यांना सामावून घेण्याची माझी तयारी आहे. ‘छत्रपती’ प्रमाणे १३ जून रोजी प्रचाराचा प्रारंभ करताना कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या नावाचीही घोषणा करणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. कारखान्याच्या स्थापनेपासून चालला नाही, असा कारखाना येत्या पाच वर्षात मी चालवून दाखविणार आहे. अध्यक्ष व संचालकांना चुकीचे काम करु देणार नाही. माळेगांवच्या आगामी संचालक मंडळाच्या कामकाजावर ‘व्हीएसआय’ची नजर ठेवली जाणार आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील विकासकामांनाही चालना देणार असून सीएसआरच्या माध्यमातूनही काही विकासकामे मार्गी लावली जातील.माझ्या हातात ज्या गोष्टी आहेत. त्या सगळ्याचा वापर करणार आहे. उगाच कोणावर अवलंबून राहणार नाही. सगळ्या यंत्रणा कामाला लावणार असून ,जे काय करायचे ते मी करणार आहे, असे सांगत पवार यांनी ‘माळेगांव’च्या निवडणुकीचे राजकीय गांभीर्य अधोरेखित केले. ‘माळेगाव’मध्ये असा अभास निर्माण केला जातो. ठराविक लोकांशिवाय तिथं चालत नाही. मात्र, आपण प्रत्येक गोष्टीत बारकाईने लक्ष घालणार आहोत. भेदभाव करणार नाही. संचालकांना कारखान्याची गाडी वापरु देणार नाही. गाडी वापरण्यासाठी निवडणुक लढवू नका. संचालकांच्या तोडणी वाहतुकीसाठी शिफारशी चालणार नाही. त्यांनी शिफारशी करण्याचे कारण नाही. माझ्या पाठीमागे असले धंदे करता, काहींनी केलेल्या शिफारशी माझ्यापर्यंत पोहचल्या आहेत. तुम्ही असले धंदे करता. काही जण माझ्या मागे उद्योग करतात आणि माझी बदनामी होते. त्यामुळे बारकाईने लक्ष घालणार आहे, अशा शब्दात पवार यांनी संबंधितांना समज दिली.
काहींना वाटत होतं की, माळेगांव सहकारी साखर कारखान्याची निवडणुक ताबडतोब लावावी. त्यांना चैन पडत नव्हती. मुख्यमंत्र्यांनां भेटून निवडुणकीचा आग्रह त्यांच्याकडुन सुरु होता. पण मी गप्प बसलो होतो. मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की, तो माझा मतदारसंघ आहे. आपण महायुतीचे घटक आहोत. छत्रपती सहकारी कारखान्याचे निवडणूक झाली की न सांगता माळेगावची निवडणूक घेण्यास सुचविल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांना टोला लगावला.