सोलापूरची तहान २ टीएमसीची, नदीला पाणी सोडले जातेय २० टीएमसी; दुहेरी समांतर पाईपलाईन रखडली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 12:12 PM2024-03-26T12:12:57+5:302024-03-26T12:13:11+5:30

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उजनी जलाशयावरून जुनी पाईपलाईन आहे तसेच दुहेरी पाईपलाईनचे काम सुरू आहे...

Solapur's thirst is 2 tmc, 20 tmc of water is being released to the river, double parallel pipeline stalled | सोलापूरची तहान २ टीएमसीची, नदीला पाणी सोडले जातेय २० टीएमसी; दुहेरी समांतर पाईपलाईन रखडली

सोलापूरची तहान २ टीएमसीची, नदीला पाणी सोडले जातेय २० टीएमसी; दुहेरी समांतर पाईपलाईन रखडली

- सतीश सांगळे

कळस (पुणे) :पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्याला वरदान लाभलेले उजनी धरण उणे ३६ टक्के झाले आहे. सोलापूर शहरातील नागरिकांना पिण्यासाठी उजनी धरणातून दरवर्षी २ टीएमसी पाण्याची गरज असताना प्रत्यक्षात दरवर्षी पिण्यासाठी २० टीएमसी पाणी भीमा नदीत सोडले जात आहे. त्यामुळेच दरवर्षी उजनी धरणातील पाणीसाठा उणेमध्ये जात आहे.

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उजनी जलाशयावरून जुनी पाईपलाईन आहे तसेच दुहेरी पाईपलाईनचे काम सुरू आहे; मात्र ती जलदगतीने पूर्णत्वास नेण्याची गरज आहे. ही योजना प्रत्यक्षात साकार झाल्यास उजनी धरणातील पाण्याची मोठी बचत होणार आहे. दरवर्षी मायनसमध्ये जाणारा उजनी धरणातील पाणीसाठा ‘प्लस’मध्ये राहील. पाईपलाईनचे काम लवकर पूर्ण झाल्यास तब्बल २० टीएमसी पाण्याची बचत होणार आहे.

सुमारे १२ लाख लोकसंख्या असलेल्या सोलापूर शहराला तीन स्रोतांमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. उजनी जलाशयातून ०.९ टीएमसी, भीमा नदीतून ०.७१ टीएमसी आणि एकरूख मध्यम प्रकल्पातून ०.१३ टीएमसी याप्रमाणे एकूण १.७४ टीएमसी पाण्याचे आरक्षण आहे.

भीमा नदीवरील पाणी पुरवठा योजनेसाठी पंपगृह टाकळी येथे आहे. हे पंपगृह भीमा नदीवरील औज व चिंचपूर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्यामधील भागात आहे. औज कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची साठवणक्षमता २०५.६९ दलघफू व चिंचपूर बंधाऱ्याची साठवण क्षमता २०८.५३ दलघफू इतकी आहे. या दोन्ही बंधाऱ्यांची एकत्रित साठवणक्षमता ४१२.२२ दलघफू (०.४१ टीएमसी) आहे. उजनी धरण ते औज बंधारा हे अंतर २३२ किलोमीटर व चिंचपूर बंधारा हे अंतर २४० किलोमीटर इतके आहे. त्यामुळे दोन टीएमसी पाण्यासाठी एकावेळी ६ टीएमसी पाणी सोडण्यात येते. वर्षभरात तीनवेळा पाणी सोडण्यात येते. यामधून २० ते २२ टीएमसी पाणी सोडले जाते.

शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी दुहेरी समांतर पाईपलाईन योजना जलदगतीने पूर्णत्वास गेल्यास पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होईल. धरणातून नदीत पाणी सोडून एका वेळेस औज व चिंचपूर बंधारे भरून देण्यासाठी सुमारे सहा टीएमसी म्हणजे या बंधाऱ्यांच्या साठवण क्षमतेच्या अंदाजे १० पट पाणी उजनी धरणातून सोडावे लागत आहे.

उजनी प्रकल्पाच्या मंजूर प्रकल्प अहवालात उजनी धरणातून भीमा नदीत पिण्यासाठी पाणी सोडण्याची तरतूद नाही. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी प्रथम प्राधान्य असल्यामुळे दरवर्षी धरणातून सुमारे २० ते २२ टीएमसी पाणी भीमा नदीत सोडण्यासाठी उजनी धरणातून आकस्मिक आरक्षण करण्यात येते.

पाणी आरक्षण

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची सोलापूर शहर पाणीपुरवठा वाढीव योजनेसाठी पिण्यासाठी ६९.६५ द.ल.घ.मी. व औद्योगिक वापरासाठी १२.९२ द.ल.घ.मी. असे एकूण ८२.५६ द.ल.घ.मी. (२.९१ टीएमसी / २२२ एमएलडी) (बाष्पीभवन) व्ययासह पाणी आरक्षणास मान्यता आहे.

भीषण पाणीटंचाई

यंदाच्या पावसाळ्यात ६० टक्के भरलेले उजनी धरण सध्या उणे ३६ टक्क्यांपर्यंत गेले असून धरणात सध्या मृतसाठ्यातील ४४ टीएमसी पाणी शिल्लक आहे. पण, त्यात अंदाजे १८ टीएमसी गाळ असून राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्बंधानुसार पूर्ण पाणी उपसा करता येत नाही. दुसरीकडे उजनी धरणावर अनेक गावांसह शहरांचा व एमआयडीसींचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उजनी धरणातील पाणी झपाट्याने कमी होत असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाई मोठी भासणार आहे

पिण्यासाठी नदीपात्रात साडेसहा टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. सध्या धरणातून नदीत १५०० क्युसेकने विसर्ग चालूच आहे. आगामी काळात परिस्थिती पाहून निर्णय होईल. सोलापूर शहराला सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी समांतर पाईपलाईनचे काम चालू आहे; मात्र याबाबत महापालिका स्तरावर तपशीलवार माहिती आहे.

- रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता उजनी धरण

Web Title: Solapur's thirst is 2 tmc, 20 tmc of water is being released to the river, double parallel pipeline stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.