पुणे: आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास करायचे नाही, हा त्या सरकारचा चुकलेला निर्णय होता. त्यामुळे राज्यातील जनतेने त्यांना निवडणुकीमध्ये नापास केले, अशी टीका विधानपरिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी नाव न घेता महाविकास आघाडीच्या तत्कालीन सरकारवर केली.
चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने फर्ग्युसन महाविद्यालयात बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डाॅ. गोऱ्हे बोलत होत्या. राज्यात मराठी शाळांचा टक्का घसरला आणि तसेच आठवीच्या मुलांना मराठी वाचता आणि लिहिताही येत नसल्याचा अहवाल असर या संस्थेने दिला आहे. हा आठवीपर्यंत परीक्षा न घेण्याच्या सरकारच्या निर्णयाचा परिणाम आहे का, असा प्रश्नावर विचारल्यानंतर गोऱ्हे यांनी त्या सरकारने चुकीचाच निर्णय घेतला होता, याच निर्णयाचा परिणाम आहे. त्यामुळेच जनतेने निवडणुकीमध्ये त्यांना नापास केल्याची टीका महाविकास आघाडीवर केली. तसेच असरच्या अहवालाचा विचारात घेऊन कार्य अहवाल तयार करण्याच्या सूचना आपण शालेय मंत्र्यांना करू, असेडी डाॅ. गोऱ्हे यांनी नमूद केले.
सामाजिक हिंसाराचाराचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. आजही महिलांवर अन्याय व अत्याचार सुरूच आहेत. स्त्री - पुरुष समानता येण्यासाठी आणखी काही वर्षांचा कालावधी लागू शकतो. मात्र, पुरुषांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. उच्च शिक्षण घेण्यामध्ये महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे. असे असले तरी इतर क्षेत्रात महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी योग्य अंमलबजावणीची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.
संमेलनाविषयी त्या म्हणाल्या, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिलेच विश्व मराठी संमेलन आहे. हे संमेलन पुण्यात होत आहे. त्यामुळे पुणेकरांनी याला चांगला प्रतिसाद द्यावा. या संमेलनात विविध उपक्रमांसह चर्चासत्र, परिसंवादांचा समावेश आहे. यावेळी राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डाॅ. श्यामकांत देवरे, नियोजन समितीचे दीपक मराठे, चारुदत्त निमकर उपस्थित होते.