अस्वच्छतेच्या विळख्यात अडकला ‘सिंहगड’; दुर्गंधीने नरवीर तानाजी मालुसरे स्मारक परिसरात श्वास घेणेही अवघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 12:22 IST2025-10-28T12:22:14+5:302025-10-28T12:22:53+5:30
सिंहगड किल्ल्याकडे जाणारे रस्तेही सध्या धोकादायक बनले असून रस्त्याच्या बाजूला सुरक्षेसाठी लावण्यात आलेले कठडे अनेक ठिकाणी ढासळले आहेत

अस्वच्छतेच्या विळख्यात अडकला ‘सिंहगड’; दुर्गंधीने नरवीर तानाजी मालुसरे स्मारक परिसरात श्वास घेणेही अवघड
कल्याणराव आवताडे
धायरी : महाराष्ट्राचे वैभव आणि मराठ्यांच्या शौर्याची गाथा सांगणारा ऐतिहासिक सिंहगड किल्ला सध्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अत्यंत वाईट अवस्थेत आहे. किल्ल्यावर सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून, नरवीर तानाजी मालुसरे स्मारक अर्धवट स्थितीत आहे. यामुळे केवळ किल्ल्याच्या सौंदर्याला बाधा येत नाही, तर पर्यटकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
किल्ल्यावरील अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न तातडीने लक्ष वेधून घेत आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाच्या परिसरात दुर्गंधीने टोक गाठले आहे. स्मारकाच्या जवळच असणाऱ्या लोखंडी बॅरलमध्ये बांधकामासाठी लागणारा चुना, गूळ आदी साहित्य अनेक दिवसांपासून तसाच ठेवला गेल्यामुळे त्यात पावसाचे पाणी साचून या परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. ड्रेनेजपेक्षाही भयंकर दुर्गंधी येत असल्याने पर्यटक आणि स्थानिकांसाठी या परिसरात श्वास घेणेही अत्यंत अवघड झाले आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या ठिकाणी अशी अस्वच्छता असणे हे दुर्दैवी आहे.
किल्ल्यावर सुरू असलेल्या बांधकामांच्या कामाकडे पुरातत्त्व विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी ही कामे अर्धवट स्थितीत आहेत. पुरातत्त्व विभाग, तसेच इतर विभागांनी या कामांना गती देणे आणि योग्य देखरेख ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा ऐतिहासिक वारसा धोक्यात येऊ शकतो.
धोकादायक रस्ते आणि ढासळलेले कठडे...
सिंहगड किल्ल्याकडे जाणारे रस्तेही सध्या धोकादायक बनले आहेत. रस्त्याच्या बाजूला सुरक्षेसाठी लावण्यात आलेले कठडे अनेक ठिकाणी ढासळले आहेत. यामुळे येथे अपघात होण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः पावसाळ्यात आणि धुक्याच्या वेळी कठडे नसल्यामुळे वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना मोठा धोका पत्करावा लागतो.
तातडीच्या उपाययोजनांची मागणी...
ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळ असलेल्या सिंहगडाची ही दुर्दशा चिंताजनक आहे. पुरातत्त्व विभाग, तसेच इतर संबंधित विभागांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी आणि पर्यटकांनी केली आहे. किल्ल्यावरील अस्वच्छता दूर करून, अर्धवट कामे पूर्ण करून आणि रस्त्यांवरील धोकादायक स्थिती सुधारून सिंहगडाला त्याचे मूळ वैभव परत मिळवून देणे गरजेचे आहे.
सिंहगडाच्या तिथे ठेवण्यात आलेल्या बॅरलमध्ये बांधकामासाठी लागणारे चुना, गूळ आदींचे साहित्य ठेवले आहे. ठेकेदाराला सांगून त्यातील साहित्य वापरता येईल, अन्यथा बॅरल पॅक करून ठेवण्याच्या सूचना करण्यात येतील. - सुनील मोहिते, कार्यकारी अभियंता, सांस्कृतिक वारसा विभाग.