पोलिसांनी ठोकल्या सोनसाखळी चोराला बेडया;१ लाख ३६ हजारांचा मुदेमाल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 13:47 IST2020-09-19T13:45:28+5:302020-09-19T13:47:33+5:30
तीन ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावुन चोरी केल्याचे निष्पन्न..

पोलिसांनी ठोकल्या सोनसाखळी चोराला बेडया;१ लाख ३६ हजारांचा मुदेमाल हस्तगत
पुणे (धायरी): सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन वेगवेगळया ठिकाणी सोनसाखळी चोरणाऱ्याचोरट्याला सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एक लाख छत्तीस हजारांचा मुदेमालही हस्तगत करण्यात आला आहे.सनी साल्वकुमार नायडु (वय :२८ वर्षे, रा. लाडली सेंटर पुढे, धायरी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी दया तेलंगे - पाटील, दत्ता सोणवणे, व श्रीकांत दगडे यांनी सीसीटीव्ही फुटेज व मिळालेल्या माहितीवरून सराईत सोनसाळखी चोऱ्या करणारा आरोपीला ताब्यात घेवुन त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावुन चोरी केल्याचे निष्षन्न झाले. तसेच त्याच्याकडून एक लाख छत्तीस हजार रुपयांचे तीन मंगळसुत्र जप्त करण्यात आले आहेत.
मित्राच्या मोटारसायकलवरून करत होता चोरी
आरोपी सनीचे शिक्षण दहावी झाले असून तो एका मोबाईल कंपनीत कामास आहे. पैशांच्या हव्यासापोटी त्याने वडगांव बुद्रुक परिसरात जानेवारी व ऑगस्ट महिन्यात ह्या तीन चोऱ्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या मित्राने लॉकडाऊनमध्ये गावी जाताना त्याच्याकडे मोटारसायकल ठेवून गेला होता. चोरी करताना त्याने मोटारसायकलच्या नंबर प्लेटवरील एक नंबरही खोडला होता. मात्र सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून खोडलेल्या नंबरच्या व्रणवरून पोलीस मोटारसायकलच्या मालकापर्यंत पोहचले आणि सदर तीनही गुन्ह्यांचा उलगडा झाला.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त पी.डी. राठोड , वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकिशोर शेळके, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि चेतन थोरबोले, पोउपनि सुधीर घाडगे, पोलीस कर्मचारी दत्ता सोनवणे, दयानंद तेलंगेपाटील, श्रीकांत दगडे, पुरुषोत्तम गुन्ला योगेश झेंडे, हरीष गायकवाड, किशोर शिंदे, अविनाश कोंडे, रफिक नदाफ यांचे पथकाने केली आहे