पुणे: पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर रुग्णांच्या जीवापेक्षा पैशांना प्राधान्य दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. २९ मार्च रोजी झालेल्या या दुर्दैवी घटनेत तनिषा भिसे (वय २७) या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालयाने एक परिपत्रक जारी करत त्यात स्वतःची बाजू मांडली आहे. आणि भिसे कुटुंबाच्या चुका दाखवल्या आहेत. त्यानंतर आता माहिती अधिकारी कार्यकर्ता विजय कुंभार यांनी माहिती अधिकाराअंतर्गत रुग्णालयाच्या परिपत्रकावर सवाल उपस्थित केले आहेत.
रुग्णालय सांगते की, रुग्ण पुढच्या नियोजित भेटीसाठी आलीच नाही. पण पुरावे दाखवतात की डॉक्टरांनी पुढची अपॉइंटमेंट २ एप्रिलसाठी दिली होती, आणि रुग्ण त्याआधीच २८ मार्च रोजी परत आली होती, म्हणजेच काहीतरी तातडी होती हे स्पष्ट होते. मग २२ मार्चची अपॉइंटमेंट चुकवली , असं का सांगितलं जातंय? असा सवाल कुंभार यांनी उपस्थित केला आहे. पुढे ते म्हणाले, रुग्णालय सांगते की, रुग्णाने ६ महिन्यांपासून ANC तपासण्या केल्याच नाहीत. पण त्यांचेच रेकॉर्ड्स त्या भेटीला “Continuum Visit” असं म्हंटलं आहे. म्हणजेच उपचार सुरूच होते. मग ती उपचाराखाली नव्हती, हे कसं म्हणता येईल? असं हि त्यांनी यावेळी विचारलं आहे. मार्चमधील तपासणी “नॉर्मल” होती, आणि फक्त निरीक्षणाचा सल्ला दिला गेला, असं रुग्णालय म्हणतं. पण तरीही त्यांनी पुढील उपचारांसाठी १० लाख रुपये आगाऊ रक्कम मागितली. फक्त निरीक्षणासाठी एवढा मोठा खर्च का? आणि आता ते म्हणतात की यापुढे आगाऊ रक्कम घेतली जाणार नाही. हा आणखी एक संशयास्पद मुद्दा प्रसिद्ध रुग्णालयात “आधी पैसे, मग उपचार” ही पद्धत कधीपासून? असा सवाल उपस्थित करत त्यांनी रुग्णालय प्रसाशनाला धारेवर धरले आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे. प्रतिष्ठेच्या भिंतींआड कोणी तरी सत्य लपवतंय. कुटुंबाला सत्य हवं आहे. जनतेला उत्तरं हवी आहेत असाही कुंभार यावेळी म्हणाले आहेत.