शुभा खोटे, अनुपम खेर आणि कविता कृष्णमूर्ती यांना यंदाचा ‘पीफ' पुरस्कार जाहीर

By नम्रता फडणीस | Updated: February 4, 2025 18:28 IST2025-02-04T18:27:47+5:302025-02-04T18:28:39+5:30

२३ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आशिष शेलार यांच्या हस्ते होणार

Shubha Khote, Anupam Kher and Kavita Krishnamurthy announced as winners of this year's 'PEEF' awards | शुभा खोटे, अनुपम खेर आणि कविता कृष्णमूर्ती यांना यंदाचा ‘पीफ' पुरस्कार जाहीर

शुभा खोटे, अनुपम खेर आणि कविता कृष्णमूर्ती यांना यंदाचा ‘पीफ' पुरस्कार जाहीर

पुणे : ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे, प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर आणि कविता कृष्णमूर्ती यांना यंदाचा ‘पीफ' पुरस्कार जाहीर झाला आहे. दि. १३ फेब्रुवारीला स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सायंकाळी ५ वाजता ’२३ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ) महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार असल्याची घोषणा आज महोत्सवाचे संचालक डॉ, जब्बार पटेल यांनी केली.

याप्रसंगी ज्येष्ठ चित्रपट समीक्षक व चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते, चित्रपट निवड समितीचे सदस्य अभिजित रणदिवे, उपसंचालक विशाल शिंदे (प्रोग्रॅम व फिल्म), उपसंचालक अदिती अक्कलकोटकर (आंतरराष्ट्रीय संपर्क व समन्वय) उपस्थित होते. पुणे फिल्म फाैंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाची थीम ही ’शो मॅन ; राज कपूर’’ जन्मशताब्दी आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे व ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण अनुपम खेर यांना ‘पीफ डिस्टींग्वीश अवार्ड’, तर ज्येष्ठ गायिका पद्मश्री कविता कृष्णमूर्ती यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी संगीतकार एस. डी. बर्मन पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

यंदा प्रख्यात चर्मवाद्य वादक विजय चव्हाण आणि सहकारी यांच्या वादनाने उद्घाटन सोहळ्याची सुरुवात होईल .उद्घाटन सोहळ्यानंतर इटलीचा मार्गारिटा व्हिकेरिओ दिग्दर्शित ' ग्लोरिया' ,या चित्रपटाने महोत्सवाचा पडदा उघडणार आहे तर स्पेनच्या द रूम नेक्स्ट डोअर; या चित्रपटाने महोत्सवाची (क्लोजिंग फिल्म) सांगता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. त्यानंतर १३ ते २० फेब्रुवारीदरम्यान ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव रंगणार आहे.

महोत्सवात चर्चासत्र आणि कार्यशाळांचे आयोजन

महोत्सवात दि. १४ फेब्रुवारीला फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांचे चर्चासत्र, दि. १५ फेब्रुवारीला उमेश कुलकर्णी, अनुपमा श्रीनिवासन, सर्वनिक कौर, कुलदीप बर्वे यांच्या कार्यशाळा पार पडणार आहेत.

बोमन इराणी यांचे विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान

दि. १६ फेब्रुवारीला बोमन इराणी यांचे ज्येष्ठ साहित्यसम्राट विजय तेंडूलकर स्मृती व्याख्यान होणार आहे. तसेच १७ फेब्रुवारीला तपन सिन्हा, स्वपनकुमार मल्लिक आणि गौतम घोष, १८ फेब्रुवारीला पॅको टोरेस यांचा Ai फिल्म्सच्या माध्यमातून चित्रपटाच्या आशयाची निर्मिती आणि दि. १९ फेब्रुवारीला मराठी पॅनल: मराठी चित्रपटातील आव्हाने: निर्मिती ते प्रेक्षक: यावर परेश मोकाशी, आदित्य सोरपोतदार, आदिनाथ कोठारे, सुनील फडतरे हे मास्टरक्लास संपन्न होईल.

११ स्क्रीनवर चित्रपट दाखविले जाणार

सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन (६ स्क्रीन), कॅम्प परिसरातील आयनॉक्स (३ स्क्रीन) आणि औंध भागातील वेस्टएंड मॉलमधील सिनेपोलिस चित्रपटगृहात (२ स्क्रीन) या तीन ठिकाणी एकूण ११ स्क्रीनवर चित्रपट दाखविले जाणार आहेत.

Web Title: Shubha Khote, Anupam Kher and Kavita Krishnamurthy announced as winners of this year's 'PEEF' awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.