नसरापूर : श्रीक्षेत्र बनेश्वर (नसरापूर, ता. भोर) येथे येत्या १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाशिवरात्री दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असून, त्या पार्श्वभूमीवर बनेश्वर देवस्थान ट्रस्ट व प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरातील शासकीय महापूजा मध्यरात्री साडेबारापर्यंत पार पडणार असून, त्यानंतर पहाटे सहा वाजेपर्यंत भाविकांना अभिषेक करता येणार आहे. शिवलिंगाची फुलांची आकर्षक सजावट केल्यानंतर भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
महाशिवरात्री यात्रेच्या नियोजनासाठी बनेश्वर मंदिराच्या सभागृहात देवस्थान ट्रस्ट, प्रशासन आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीस देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष हनुमंत कदम, सचिव अनिल गयावळ, खजिनदार प्रकाश जंगम, विश्वस्त आबासाहेब यादव, काशीनाथ पालकर, अतुल हरगुडकर, सतीश वाल्हेकर, ज्योती चव्हाण, नसरापूरच्या सरपंच उषा कदम, मंडलाधिकारी प्रदीपकुमार जावळे, ग्राम महसूल अधिकारी अतुल निर्मळ, महावितरणचे उपअभियंता सौरभ बराब्दे, वनविभाग, आरोग्य विभाग, राजगड पोलिस ठाण्याचे प्रतिनिधी, तसेच ट्रस्टचे पदाधिकारी व पुजारी उपस्थित होते.
भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. आरोग्य विभागाकडून डॉक्टर, कर्मचारी व रुग्णवाहिकेची व्यवस्था, तर महावितरणकडून अखंड वीजपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. नसरापूर ग्रामपंचायतीच्या वतीने दर्शनबारीसाठी मंडप, पिण्याच्या शुद्ध पाण्याचे टँकर, तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी निर्जंतुकीकरण साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वनविभागाकडून वनहद्दीत नियोजनबद्ध पद्धतीने दुकानदारांना जागा देण्यात येणार असून परिसराची स्वच्छता राखली जाणार आहे. राजगड पोलिसांकडून दर्शनबारी व यात्रा क्षेत्रात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, बनेश्वर मंदिराच्या कळसाचा जीर्णोद्धार पूर्ण झाला असून, संपूर्ण मंदिरातील जुना रासायनिक रंग काढून ऐतिहासिक स्वरूप जपण्यासाठी दगडांना पॉलिश करण्यात आले आहे. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असल्याने यात्रा काळात मंदिर ते बनेश्वर फाटा यादरम्यान खासगी वाहनांना प्रवेश राहणार नाही. भाविकांच्या वाहनांसाठी नसरापूर गावात वाहनतळाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांनी सहकार्य करावे व नियोजनानुसार दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
Web Summary : Baneshwar temple prepares for Mahashivratri with special arrangements. Devotees can offer Abhishek until 6 AM after midnight prayers. The temple is renovated, and parking is arranged in Nasrapur due to road work.
Web Summary : बनेश्वर मंदिर महाशिवरात्रि के लिए विशेष व्यवस्था के साथ तैयार है। भक्त आधी रात की प्रार्थना के बाद सुबह 6 बजे तक अभिषेक कर सकते हैं। मंदिर का नवीनीकरण किया गया है और सड़क निर्माण के कारण नसरापुर में पार्किंग की व्यवस्था की गई है।