सांगवी (बारामती) : खंडित झालेला वीज प्रवाह अचानक सुरळीत झाल्या नंतर झोपेत असतानाच घरातील पंख्याला शॉर्टसर्किट होऊन विज प्रवाहाच्या धक्क्याने पती-पत्नीचा जागीच जीव गेल्याची हृदयद्रावक घटना सांगवी (ता. बारामती) येथून समोर आली आहे. अवकाळी पावसामुळे अचानकपणे वीज खंडित झाली, दरम्यान पुन्हा वीज पुरवठा सुरळीत झाला असता वीज प्रवाह घरात उतरला होता. यामुळे पंखा खाली ठेवलेल्या ठिकाणी झोपलेल्या पती-पत्नीला विजेचा धक्का बसला आणि झोपेतच दोघांचाही मृत्यू झाला.
हृदय पिळून टाकणाऱ्या या घटनेने सांगवीसह आजूबाजूच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. बुधवारी (दि.२) पहाटे ही घटना उघडकीस आली. या दुर्घटनेत नवनाथ रामा पवार (वय 40) व त्यांच्या पत्नी संगीता नवनाथ पवार (वय 38 ) असे मृत्यू पावलेल्या दांपत्याची नावे आहेत.पवार दांपत्याला दोन मुले तर एक मुलगी आणि नातवंडं असा हसता खेळता परिवार होता.
याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री अवकाळी पाउस सुरू होता. वादळी पावसाच्या अलर्ट च्या इशाऱ्यानंतर बारामती तालुक्यातील विविध भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. नंतर रात्री ११ वाजता वीज पुरवठा सुरू झाला.
मात्र सकाळी हे जोडपे उशिरा पर्यंत उठले नसल्याने नातेवाईकांना शंका आली. खिडकीतून पाहिले असता पंख्याच्या वीजेचा धक्का रात्री लागल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी दार तोडून पुढील अनर्थ टाळण्यासाठी पंख्याचा वीजप्रवाह बंद करून दोघांचा मृतदेह बाहेर काढला,दरम्यान घटनास्थळी माळेगाव पोलिसांनी भेट देऊन पाहणी करत पंचनामा केला. मात्र ही घटना कशामुळे नेमकी घडली याबाबत वीज वितरणच्या तांत्रिक तज्ञांमार्फत तपासणी केली जाणार आहे.