Pune: दुकानदाराने शीतपेय नाही दिले; टोळक्याने थेट वार केला; हडपसर भागात दहशत
By नितीश गोवंडे | Updated: June 13, 2024 18:16 IST2024-06-13T18:16:03+5:302024-06-13T18:16:37+5:30
आरोपींनी दुकानातील साहित्याची तोडफोड केली. त्यावेळी या भागातील नागरिक तेथे जमले....

Pune: दुकानदाराने शीतपेय नाही दिले; टोळक्याने थेट वार केला; हडपसर भागात दहशत
पुणे : शीतपेय देण्यास नकार दिल्याने टोळक्याने दुकानदारावर कोयत्याने वार करून तोडफोड केल्याची घटना हडपसर भागात घडली. टोळक्याने परिसरातील दुकानदारांवर काेयते उगारून दहशत माजवली. याप्रकरणी अमोल जगन्नाथ गाडेकर (वय २९, रा. साडेसतरानळी, तोडमल वस्ती, हडपसर) याच्यासह तीन अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात दुकानदार राजेशकुमार सत्यनारायण सिंग (३५, रा. मांजराई व्हिलेज सोसायटी, मांजरी बुद्रुक, हडपसर) जखमी झाले आहेत. त्यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अधिक माहितीनुसार, राजेशकुमार यांचे साडेसतरानळी चौकात दुकान आहे. बुधवारी (दि. १२) रात्री त्यांच्या दुकानात आरोपी गाडेकर आणि साथीदार आले. त्यांनी सिंग यांच्याकडे शीतपेयाच्या ४० बाटल्या मागितल्या. सिंग यांनी बाटली देण्यास नकार दिला. आरोपी गाडेकर याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदारांनी सिंग यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केला.
आरोपींनी दुकानातील साहित्याची तोडफोड केली. त्यावेळी या भागातील नागरिक तेथे जमले. तेव्हा आरोपींनी कोयते उगारून दहशत माजवली. परिसरातील दुकानात शिरून तोडफोड केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. उपनिरीक्षक मुलाणी अधिक तपास करत आहेत.