पुणे : आयुष कोमकर खून प्रकरणानंतर पुण्यात गुन्हेगारीला पुन्हा एकदा सुरुवात झाल्याचे दिसून आले आहे. अशातच मध्यरात्री घडलेल्या कोथरूडमधीलगोळीबाराच्या घटनेने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. कालच्या घटनेत प्रकाश धुमाळ या सामान्य नागरिकावर किरकोळ कारणांवरुन गोळीबार झाला. त्यांनतर जवळपास अर्धा तास हा व्यक्ती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एका इमारतीत जखमी अवस्थेत लपून बसला होता. गोळीबाराच्या घटनेपासून कोथरूड पोलीस स्टेशन २ मिनिटांच्या अंतरावर असूनही पोलीस अर्ध्या तासाने घटनास्थळी आल्याचे स्थानिकांनी सांगितले. यावरून आता गुंडांना पोलिसांचा धाक राहिला नाही. तर पोलिसानांही नागरिकांची काळजी नसल्याचे दिसून येत आहे.
गाडीला साईड न दिल्याच्या किरकोळ कारणावरून मध्यरात्री कोथरूड भागात गोळीबार झाला आहे. यावरून असे दिसते की, गुंडांना आपली दहशत निर्माण करायची आहे. त्यांना आता पोलिसांचा धाक राहीला नाही. या गुन्हेगारी टोळ्यांचा सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रात्री अपरात्री जीव मुठीत धरूनच फिरावे लागत असल्याचे पुणेकरांचे म्हणणे आहे. मागील वर्षीसुद्धा वनराज आंदेकर याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही घटना तर पुण्याच्या मध्यवर्ती भागात नाना पेठेत घडली. त्याच वर्षी शरद मोहोळ याची कोथरूड भागात हत्या करण्यात आली होती. आता एक वर्षानंतर पुन्हा एकदा गुन्हेगारीला सुरुवात झाल्याचे दिसते आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणानंतर काल घायवळ टोळीकडून सामान्य नागरिकावर गोळीबार झाला आहे.
आधीच्या घटनांमध्ये गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्यांनी भरदिवसा गुन्हा केला होता. पूर्ववैमनस्यातून या घटना घडल्या होत्या. आता मात्र सामान्य नागरिकावर गोळीबार झाल्याने सर्व पुण्यातच भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी अशा गुंडांवर कडक कारवाई करावी. त्यांना पोलिसांचा धाक राहिला पाहिजे. सामान्य नागरिकाला अशा प्रकारे त्रास सहन करावा लागू नये. तसेच कोणीही भीतीच्या छायेत राहू नये. अशा प्रकारे पोलिसांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
घटनास्थळ पोलीस स्टेशनपासून चालत दिड ते दोन मिनिटांच्या अंतरावर
गोळीबाराची घटना घडली ते ठिकाण कोथरुड पोलीस स्टेशनपासून चालत दिड ते दोन मिनीटांच्या अंतरावर आहे. मात्र बुधवारी रात्री या ठिकाणी घायवळ टोळीतील गुंडांनी गोळीबार केला. गोळीबारानंतर अर्ध्या तासांनी पोलीस आले असं स्थानिकांनी सांगितले आहे. तोपर्यंत प्रकाश धुमाळ नावाची व्यक्ती जीव मुठीत धरुन पाण्याच्या टाकीवर बसून होती. या घटनेने पुण्यात गुंडांना पोलीसांचा जरब उरलाय का? हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.