Shocking! Woman commits suicide by not getting bed | धक्कादायक! उपचारासाठी मिळाला नाही बेड, कोरोनाबाधित महिलेने आत्महत्या करत जीवन संपवलं

धक्कादायक! उपचारासाठी मिळाला नाही बेड, कोरोनाबाधित महिलेने आत्महत्या करत जीवन संपवलं

ठळक मुद्देशारीरिक आणि मानसिक त्रासाने निवडला आत्महत्येचा मार्ग

पुणे: वारजे - माळवाडी येथे ४१ वर्षीय महिलेने बेड न मिळाल्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. परंतु सर्वतोपरी प्रयत्न करूनही बेड उपलब्ध झाला नाही. अशा वेळी शारीरिक आणि मानसिक त्रासाने त्रस्त झालेल्या महिलेने थेट आत्महत्येचा मार्ग निवडला आहे. या हृदयद्रावक घटनेने वारजे माळवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. त्यानंतर वारजे पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


या घटनेबाबत महिलेच्या पतीने सांगितले आहे की, माझ्या पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर आम्ही डॉक्टरकडे गेलो. त्यावेळी तिला खोकल्याचा आणि श्वास घेण्यास त्रास सुरू झाला होता. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. परंतु सद्यस्थितीत कोणत्याही रुग्णालयात बेड उपलब्ध नव्हते. सर्व रुग्णालयांनी दाखल करून घेण्यास नकार दिला. माझी पत्नी पूर्णपणे हताश झाली होती. ती मानसिकदृष्ट्या खचून जाऊ नये. म्हणून मी तिला आधार देण्याचा प्रयत्नही केला. तुझ्या उपचारासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी पत्नीचा पंख्याला लटकलेला मृतदेह डोळ्यासमोर दिसला. मी तिला बेड मिळवून देऊ शकलो नाही. याचे मला दुःख वाटत आहे. या आजारामुळे मला खूप वेदना होत आहेत. मी हे सहन करू शकत नाही. असे तिने चिठ्ठीत लिहिले होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ एप्रिलला दुपारी साडेचारच्या सुमारास महिलेची तब्येत बिघडण्यास सुरुवात झाली. डॉक्टरांच्या सल्ल्याने तिने कोरोना चाचणी केली. महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. एकही बेड उपलब्ध नसल्याने शेवटी पती - पत्नी दोघेही घरी आले. त्यादिवशी रात्री पतीने जेवण बनवले. तिला काही औषधे दिली. महिला आतल्या खोलीत एकटी झोपली होती. सकाळी पती तिला उठवायला गेल्यावर बेडरूमच्या पंख्याला दुपट्टा लावून गळफास घेतल्याचे पतीला दिसले. तसेच सोबत चिट्ठीही लिहून ठेवली होती. वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. ते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

कोरोनाच्या चिंताजनक परिस्थितीत असे आत्महत्येचे विचार मनात येणाऱ्या लोकांनी ०९९२२००४३०५ या नंबरशी संपर्क साधावा. 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shocking! Woman commits suicide by not getting bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.