चाकण : चाकण (ता.खेड ) परिसरात एमडी ड्रग्जची विक्री खुलेआम सुरु आहे. हॉटेल ग्रँड समोर एक काळ्या स्कॉर्पिओ गाडीतून घेऊन जात आहे. खबर पक्की आहे. विक्री करणाऱ्याला सोडू नका, मॅनेज होऊ नका. आत्ताच धाड टाकलीत तर आरोपी जाळ्यात सापडेल अशी खबर मिळताच चाकण पोलिसांनी सापळा रचून स्कॉर्पिओ मालकाला बेड्या ठोकल्या. मात्र, पोलिसांनी अतिशय शिताफीने तपास केला आणि हा एक कटाचा भाग असल्याचं समोर आणलं. धक्कादायक म्हणजे खबर देणाराचं खरा सूत्रधार निघाला. जमीन व्यवहाराच्या वादातून मित्रांनी मित्रालाच खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी रचलेल्या कटाचा पर्दाफाश करण्यात आला. चाकण पोलिसांच्या डीबी पथकाने अतिशय शिताफीने हा तपास केला.
सत्य कसं आलं समोर?
जमिन प्लॉटिंगच्या व्यवहारातून तुषार कड याचे निखिल कड आणि राहुल टोपे (तिघे रा.वाकी,ता.खेड,जि. पुणे ) यांच्यात आर्थिक देवाण - घेवाणीवरून वाद झाले होते. मैत्रीत वितुष्ट आल्यानंतर काहीही करुन तुषारला धडा शिकवायचा, असा निखिल आणि राहुलने चंग बांधला. मात्र आपण काही कट रचतोय याची कल्पना तुषारला होता कामा नये. याची ही खबरदारी त्यांनी घेतली. मग मित्र हनिफ मुजावरला देखील सोबतीला घेतलं. हनिफने पुण्यातील खबरी वसीम शेखच्या कानावर ही बाब टाकली. या चौघांच्या चर्चेत तुषारला एमडी ड्रग्ज प्रकरणात अडकविण्याचा कट ठरला. त्यानुसार हनिफकडे दहा लाख रुपये देण्यात आले. हनिफने एमडी ड्रग्ज उपलब्ध केलं. एका सिल्व्हर कागदात आठ छोट्या पिशव्यांमध्ये हे एमडी ड्रग्ज होतं. तुषारच्या गाडीची चावी निखिलकडे असायची, त्यामुळं ड्रग्जची पिशवी ड्रायव्हर सीटच्या पाठीमागे ठेवण्यात त्यांना कोणती अडचण आली नाही. यानंतर वसीमने चाकण पोलिसांना खबर देण्याची भूमिका स्वीकारली.
फसवायला गेला अन्...
पुणे नाशिक महामार्गावरील चाकण गावच्या हद्दीतील हॉटेल ग्रँड समोर तुषार आणि निखिल व्यवहाराबाबत चर्चा करत होते. निखिलने ते लोकेशन पोलिसांचा खबरी म्हणून काम करणाऱ्या वसीमला दिलं. वसीमने पुढे चाकण पोलिसांनी ते लोकेशन दिलं आणि तिथं स्कॉर्पिओचा मालक खुलेआम एमडी ड्रग्जची विक्री करतोय, त्याला रंगेहाथ अटक करा, मॅनेज होऊ नका. असा मेसेज ही वसीमने दिला. पोलिसांनी ही तातडीनं सापळा रचला आणि तुषारला बेड्या ठोकल्या. त्यावेळी तिथं उपस्थित असणाऱ्या निखिलने माझा मित्र असं करुच शकत नाही. तुम्ही विनाकारण त्याला ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतलं आहे. असं म्हणत निखिलने तुषारची बाजू घेतली. पण एमडी ड्रग्ज गाडीत आढळल्यानं चाकण पोलिसांनी तुषारला अटक केली. परंतु पुढील तपासात तुषारने वेळोवेळी हे नाकारलं आणि मला यात गोवण्याचा प्रयत्न केलं जातं असल्याचं ठामपणे पोलिसांना सांगितलं. मग पोलिसांनी त्याचे क्राईम रेकॉर्ड तपासले असता त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची नसल्याचं आढळलं. त्यानंतर चाकण पोलिसांनी तपासाची चक्र उलट फिरवली आणि अतिशय शिताफीने तपास करत या कटाचा पर्दाफाश केला. चाकण डीबी पथकाच्या या कामगिरीने खोट्या गुन्ह्याचा फर्दाफास केला आहे. यामुळे तुषार कड लवकरचं या प्रकरणातून निर्दोष मुक्त होणार आहे. चाकण पोलिसांनी आत्तापर्यंत निखिल कड, राहुल टोपे अन वसीम शेखच्या मुसक्या आळवल्यात आहेत. तर हनिफ मुजावरचा शोध सुरु आहे. त्याच्या अटकेनंतर एमडी ड्रग्ज कुठून उपलब्ध केलं याची माहिती समोर येणार आहे.