Pune: महिलेचा खून करून मृतदेह निर्जनस्थळी पुरल्याचा धक्कादायक प्रकार; चाकण येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 13:19 IST2022-10-08T13:16:49+5:302022-10-08T13:19:00+5:30

पोलिसांनी पतीला आणि सासऱ्याला ठोकल्या बेड्या...

Shocking manner of murdering a woman and burying her body in a deserted place; Incident at Chakan | Pune: महिलेचा खून करून मृतदेह निर्जनस्थळी पुरल्याचा धक्कादायक प्रकार; चाकण येथील घटना

Pune: महिलेचा खून करून मृतदेह निर्जनस्थळी पुरल्याचा धक्कादायक प्रकार; चाकण येथील घटना

चाकण (पुणे) : अनैतिक संबंधातून महिलेचा खून करून मृतदेह निर्जनस्थळी पुरल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. ६) चाकण - आळंदी रस्त्यावरील वनविभागाच्या हद्दीत आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी तिच्या पतीला आणि सासऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत.

आशा गोरक्षनाथ देशमुख (३० वर्षे, सध्या रा. बोरजाईनगर, मेदनकरवाडी, ता. खेड, मूळ रा. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मयत महिलेचा पती गोरक्षनाथ बबन देशमुख (३५, रा. बोरजाईनगर, मेदनकरवाडी), सासरा बबन शिवलिंग देशमुख (६२, रा. पेडगाव, श्रीगोंदा) आणि रोशन गजानन भगत (२२, रा. मेदनकरवाडी) अशा तीन जणांना बेड्या ठोकल्या असून, रोशन याचे मित्र रेवा आणि मुंडे दोघेजण फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिलेचा पती गोरक्षनाथ याने दि. २९ ऑगस्ट रोजी वरील आरोपींच्या मदतीने पत्नी आशा हिचा दोरीच्या साह्याने गळा आवळून खून केला. त्यानंतर चाकण - आळंदी रस्त्यावरील वनविभागाच्या जंगलात मृतदेह नेऊन पुरला. त्यानंतर स्वतःवर संशय येऊ नये यासाठी पोलिसात पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.

गोरक्षनाथ याने सर्वांच्या मदतीने दि. १ ऑक्टोबरला पत्नीचा खड्ड्यात पुरलेला मृतदेह बाहेर काढून जंगलात जाळला. मात्र त्यावेळी पाऊस पडल्याने मृतदेह पूर्णपणे जळला नसल्याने अर्थवट जळलेला मृतदेह जवळील पाण्याच्या तळ्यात फेकून दिला होता. परिसरात दुर्गंधी सुटल्याची खबर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कार्यवाहीकरिता उत्तरीय तपासणीसाठी पाठवला होता. त्यात महिलेचा गळा आवळून खून झाला असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी पती गोरक्षनाथ याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुली दिली. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Shocking manner of murdering a woman and burying her body in a deserted place; Incident at Chakan