भयानक! पुण्यात बायकोला लॉजवर बोलवून नवऱ्याने केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 17:29 IST2018-02-19T17:17:24+5:302018-02-19T17:29:27+5:30
मंगळवार पेठ येथील लॉजमध्ये उतरलेल्या पतीने पत्नीची रशीने गळा आवळून हत्या केली. रविवारी रात्री ही घटना घडली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती स्वत:हून बंड गार्डन पोलीस स्थानकात हजर झाला.

भयानक! पुण्यात बायकोला लॉजवर बोलवून नवऱ्याने केली हत्या
पुणे - मंगळवार पेठ येथील लॉजमध्ये उतरलेल्या पतीने पत्नीची रशीने गळा आवळून हत्या केली. रविवारी रात्री ही घटना घडली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती स्वत:हून बंड गार्डन पोलीस स्थानकात हजर झाला व गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी मलय कुमार सिंहला अटक केली असून तो मूळचा बिहारचा आहे. मुंबईमध्ये तो एम्ब्रॉयडरीचे काम करायचा. त्याचा पुण्यात राहणाऱ्या दीपा असवारेबरोबर लग्न झाले होते.
मागच्या काही महिन्यांपासून मलय आणि दीपामध्ये वाद सुरु होते अशी माहिती समर्थ पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र मोहिते यांनी दिली. मलय कुमार मुंबईत नोकरीसाठी गेल्यानंतर दीपा पुण्यात आई-वडिलांकडे रहात होती. मलय कुमार सतत दीपाच्या निष्ठेवर संशय घ्यायचा आणि तिला त्रास द्यायचा असे पोलिसांनी सांगितले.
रविवारी मलय कुमार पुण्यात आल्यानंतर मंगळवार पेठ येथील लॉजमध्ये रुम बुक केली. त्याने पत्नीला लॉजवर बोलवून घेतले. तिथे मलयने तिच्यावर परपुरुषाबरोबर संबंध असल्याचा आरोप केला. त्यावरुन दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. संतापाच्या भरात मलयने रुममधील रशी उचलली व गळा आवळून दीपाची हत्या केली. दीपाच्या शरीराची हालचाल थांबल्यानंतर मलय स्वत:हून बंड गार्डन पोलीस स्थानकात गेला व गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.