राजगुरूनगर : खरपुडी बुद्रुक मांडवळा (ता.खेड ) येथे जातीय प्रेम विवाहातून मारहाण आणि अपहरण झाल्याचा सैराट चित्रपटाप्रमाणे धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. रविवारी (दि ३) दुपारी घडलेल्या या घटनेत पतीला पाय मोडे पर्यंत मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात मुलीचा भाऊ आणि आई सह १८ ते २० जणांवर अपहरण आणि जबर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सुशीला राजाराम काशिद, अक्षय उर्फ गणेश राजाराम काशिद, बंटी काशिद व इतर १५ ते १६ अनोळखी युवकांवर खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.विश्वनाथ बबन गोसावी ( वय ४३, रा.खरपुडी बुद्रुक, ता.खेड ) असे पती आणि तक्रारदाराचे नाव आहे.तर त्याची पत्नी प्राजक्ता गोसावी, वय २८ वर्ष असे मारहाण करून अपहरण झालेल्या पत्नीचे नाव आहे.
याबाबत खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विश्वनाथ गोसावी व त्यांचा परिवार खरपुडी येथे आश्रम चालवतात. त्याचे आणि पत्नी प्राजक्ता यांच्यात प्रेम जुळले. त्यातून त्यांनी ५ ऑगस्ट २०२४ रोजी रजिस्टर लग्न केले. मात्र आंतरजातीय विवाह केला म्हणुन मुलीच्या आई, भावाकडून त्याला विरोध होताच. रविवारी दुपारी सव्वा वाजता मुलीच्या माहेरच्या लोकांनी घरी येऊन प्राजक्ताला जबरदस्ती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यात आडकाठी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे पती विश्वनाथ गोसावी याला मुलीचे भाऊ व बरोबर आलेल्या इतरांनी मारहाण केली. दहशत निर्माण करून मुलीला घेऊन गेले. पायावर मारहाण करण्यात आल्याने विश्वनाथ याचा पाय मोडला. त्याला पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.