पुणे : आयटी क्षेत्रातील उच्चशिक्षित जोडप्यांचा परस्पर संमतीने करण्यात आलेला घटस्फोटासाठीचा अर्ज कौटुंबिकन्यायालयाने केवळ आठ दिवसांत मंजूर केला. दोघेही आयटी क्षेत्रात नोकरीला असून दीड वर्षांपासून विभक्त राहत होते. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश सुभाष काफरे यांनी याबाबत आदेश दिला आहे. ६ जानेवारी रोजी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने १४ जानेवारी रोजी मंजूर केला. माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यांनी अॅड.विक्रांत शिंदे, अॅड.मंगेश कदम, अॅड. निखिल डोंबे आणि अॅड.सौदामिनी जोशी यांच्यामार्फत घटस्फोटासाठी अर्ज केला होता. माधव आणि माधवी यांचा विवाह डिसेंबरमध्ये पुण्यात झाला. त्यांना कोणतेही अपत्य नाही. दोघांचे पटत नव्हते. शारीरिकरित्या दोघे दूर राहिले होते. इतक्या दिवसापासून वेगळे राहणाऱ्या दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. दोघांमध्ये अटी, शर्ती पुर्तता झाली असल्यामुळे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अमरदीप कौर वि. हरदीप कौर या न्यायनिवाड्याला अनुसरून हा निकाल असल्याचे अॅड. विक्रांत शिंदे यांनी सांगितले.
कौटुंबिक न्यायालयाकडून केवळ आठ दिवसांत घटस्फोट मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 20:12 IST