पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. कधीकाळी बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात काँग्रेसचे नेते सत्तेच्या बाजूने जाऊ लागले आहेत. माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि संग्राम थोपटे यांनी काँग्रेस सोडली. आता पुरंदरचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनीही काँग्रेसला राम राम केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जगताप भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
लोकसभा निवडणुकीमध्ये हत्तीचं बळ आलेल्या काँग्रेसची अवस्था विधानसभा निवडणुकीत वाईट झाली. त्यानंतर पक्षातील नेत्यांचा आत्मविश्वास कमी झाल्याचे दिसत असून, अनेकजण सत्तेच्या बाजूने जाताना दिसत आहेत. काही जणांनी पक्षांतरे केली आहेत, तर काही प्रयत्न करताना दिसत आहेत.
संजय जगताप पराभवापासून गेले होते बाजूला
पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून सक्रिय राजकारणापासून बाजूला गेले होते. पण, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, नेते सक्रीय झाले आहेत.
त्यामुळे पक्षांतरेही वाढली आहेत. गेल्या काही काळात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील अनेक नेते महायुतीतील तिन्ही पक्षात गेले आहेत. आता काँग्रेसच्या संजय जगताप यांनीही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
संग्राम जगताप यांनी सासवड आणि जेजुरी या दोन नगरपालिकेच्या अनुषंगाने हा निर्णय घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या दोन्ही नगरपालिका ताब्यात ठेवण्यासाठी सत्तेतील पक्षात जाणे फायद्याचे असल्याने ते भाजपत जात असल्याचे सांगितले जात आहे.
माजी आमदार संजय जगताप हे १६ जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश मुंबईत होणार की, सासवडमध्ये याबद्दल मात्र अद्याप निर्णय झालेला नाही.