शिवरायांच्या पुतळ्यांची साफसफाई, रंगरंगोटी होणार; पुण्यात शिवजंयती जल्लोषात साजरी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 16:11 IST2025-01-23T16:09:52+5:302025-01-23T16:11:09+5:30

पुणे महापालिकेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्व पुतळे व स्मारकांच्या ठिकाणी साफसफाई, रंगरंगोटी व रोषणाई केली जाईल

Shivaji's statues will be cleaned and painted; Shiva Jayanti will be celebrated with joy in Pune | शिवरायांच्या पुतळ्यांची साफसफाई, रंगरंगोटी होणार; पुण्यात शिवजंयती जल्लोषात साजरी करणार

शिवरायांच्या पुतळ्यांची साफसफाई, रंगरंगोटी होणार; पुण्यात शिवजंयती जल्लोषात साजरी करणार

पुणे: शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जल्लोषात साजरी केली जाणार आहे. त्यासाठी पुणे महापालिकेने मिरवणुक मार्गावरील रस्त्याची दुरूस्ती करावी. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्व पुतळे व स्मारकांच्या ठिकाणी साफसफाई, रंगरंगोटी व रोषणाई करावी अशी मागणी कार्यकत्यानी पुर्वतयारी बैठकीत केली. त्यावर पुणे महापालिका सर्व सुविधा उपलब्ध करून देईल असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले.

शिवजयंतीच्या पूर्वतयारी बैठकीला अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी., उपायुक्त माधव जगताप, संदीप कदम, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, नगरसचिव योगिता भोसले आदी उपस्थित होते. शहरातील विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटना, शिवजयंती मंडळाचे पदाधिकारी बैठकीत सहभागी झाले होते. मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. त्यावर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्तांनी दिले.

‘शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व पुतळ्यांची स्वच्छता करून पुष्पहार घालण्यात यावेत. मिरवणूक मार्गावर पाण्याची व्यवस्था, फिरता दवाखाना व मोबाइल टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून दिली जावी. चित्ररथांच्या मार्गावर पाण्याची व्यवस्था करावी, फिरता दवाखाना व फिरत्या शौचालयांची व्यवस्था करावी. मिरवणूक मार्गावरील झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी. चित्रकला स्पर्धेबरोबरच चित्ररथ स्पर्धाही घ्यावी.शाळांमधून चित्रकला, वक्तृत्व, महानाट्य तसेच वेशभूषा स्पर्धा घेण्यात याव्यात. मिरवणूक परवानगीसाठी एक खिडकी योजना राबवावी. लालमहाल राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी प्रयत्न करावेत. समाविष्ट गावांमधील शिवस्मारकांची स्वच्छता करून त्यावर विद्युत रोषणाई करून पुष्पहार अर्पण करावा, आदी मागण्या विविध कार्यकर्त्यांनी केल्या.

महापालिकेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्व पुतळे व स्मारकांच्या ठिकाणी साफसफाई, रंगरंगोटी व रोषणाई केली जाईल. आवश्यकतेनुसार झाडांच्या फांद्या छाटण्यात येतील. रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल. मिरवणूक मार्गांवरील फायबर ऑप्टिकल केबल काढण्यात येतील. लाल महालाची स्वच्छता केली जाईल. तसेच शिवजयंतीच्या दिवशी लालमहाल अधिक वेळ खुला ठेवण्यात येईल. त्याचबरोबर लाल महाल राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठीही प्रयत्न केले जातील. शिवजयंतीच्या तयारीसाठी क्षेत्रीय स्तरावरही बैठका घेण्यात येतील. समाविष्ट गावांमध्येही शिवजयंतीच्या अनुषंगाने आवश्यक ती कामे केली जातील. गरजेनुसार फिरत्या शौचालयांची व्यवस्था केली जाईल. सांस्कृतिक विभागातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन केले जाईल,’असे पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले.

‘पोलिसांकडील एक खिडकी योजनेतून परवाने देणार

‘मिरवणुकीसाठी लवकरात लवकर परवाने देण्याचा प्रयत्न करू. मिरवणुकींसाठी पोलिसांकडून सहकार्य केले जाईल, असे आश्वासन पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिले.

Web Title: Shivaji's statues will be cleaned and painted; Shiva Jayanti will be celebrated with joy in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.