Shivneri Fort | किल्ले शिवनेरीवर येणार लाखभर मावळे; ‘शिवकालीन गाव’ महोत्सवाचे आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 10:46 IST2023-02-16T10:45:01+5:302023-02-16T10:46:31+5:30
जवळपास एक लाख शिवप्रेमी सहभागी होण्याचा अंदाज..

Shivneri Fort | किल्ले शिवनेरीवर येणार लाखभर मावळे; ‘शिवकालीन गाव’ महोत्सवाचे आयोजन
पुणे : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त किल्ले शिवनेरी येथे १८ ते २० फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. यात ‘शिवकालीन गाव’ हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे. यावर्षी प्रथमच ‘महाशिव आरती’चेही आयोजन केले आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. जवळपास एक लाख शिवप्रेमी सहभागी होण्याचा अंदाज आहे.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित राहणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा ३९३ वी जयंती साजरी होत असून, महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा आणि लोकसंस्कृतीविषयी अभिमान व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन पाटील यांनी केले. यानिमित्त शिववंदना, स्थानिक पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिबिर, विविध स्पर्धांचे आयोजन, पर्यटक आणि मान्यवरांसाठी सहलीचे आयोजन करण्यात येईल. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून, तो सर्वांसाठी खुला आहे.