शिवजयंतीला सवलतीत सोडावी शिवशाही बस; दिवाकर रावते यांच्याकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 13:02 IST2018-01-19T12:56:06+5:302018-01-19T13:02:08+5:30
शिवजयंतीला सवलतीच्या दरात ‘शिवशाही’ बससेवा द्यावी अशी मागणी सह्याद्री गिरीभ्रमण संस्था आणि खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

शिवजयंतीला सवलतीत सोडावी शिवशाही बस; दिवाकर रावते यांच्याकडे मागणी
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार आणि तारखेनुसार येणाऱ्या जयंतीला (४ मार्च) एस.टी. महामंडळाने शिवनेरी आणि रायगड किल्ल्याला जाण्यासाठी सवलतीच्या दरात ‘शिवशाही’ बससेवा द्यावी अशी मागणी सह्याद्री गिरीभ्रमण संस्था आणि खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
महाराजांची जयंती १९ फेब्रुवारी आणि तिथीनुसार (यंदा ४ मार्च २०१८) साजरी केली जाते. त्यासाठी शिवनेरी बसच्या प्रवास शुल्कामध्ये विशेष सवलत देण्यात यावी. तसेच प्रवाशांना परतीच्या प्रवासा दरम्यान ग्रामीण खाद्यसंकृतीचा आनंद घेता यावा यासाठी शिवनेरीच्या पायथ्याशी स्थानिकांच्या सहकार्याने विशेष शाकाहारी वन भोजनाचे आयोजन करता येईल. यामाध्यमातून स्थानिकांना देखील रोजगार उपलब्ध होईल, असे संस्थेच्या वतीने सूचविण्यात आले आहे. तसेच, याचप्रकारची बससेवा शिवराज्याभिषेक आणि शिवपुण्यतिथीला रायगडावर देखील करावी अशीही मागणी पत्रात केली आहे.
दरम्यान संस्थेच्या वतीने या मागणीचे पत्र पुणे, नाशिक आणि मुंबईच्या विभागीय नियंत्रकांना देखील दिले असल्याचे संस्थेचे अध्यक्ष संजय खत्री यांनी सांगितले. तर किल्ले पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध किल्ले एसटीच्या बससेवेद्वारे जोडण्यात यावेत. या बससेवेला किल्ल्यांची नावे देण्यात यावीत. अशी मागणी देखील यापूर्वीच महामंडळाकडे करण्यात आली आहे.