उमेदवारीच्या शब्दानंतरच शिवसैनिक नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

By राजू इनामदार | Updated: January 8, 2025 18:35 IST2025-01-08T18:33:37+5:302025-01-08T18:35:40+5:30

भाजपचे निष्ठावंत अस्वस्थ : २०१७ ची पुनरावृत्ती होणार असल्याची चर्चा

Shiv Sainik corporators join BJP only after promising to contest | उमेदवारीच्या शब्दानंतरच शिवसैनिक नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

उमेदवारीच्या शब्दानंतरच शिवसैनिक नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

पुणे : उद्धवसेनेतील पाच नगरसेवकांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश त्यांना उमेदवारीचा शब्द दिल्यानंतरच झालेला असल्याची चर्चा आहे. याशिवाय अन्य पक्षांमधूनही भाजपात काही प्रवेश होण्याची चिन्हे दिसत आहेत. सन २०१७ ची पुनरावृती झाली तर काय? अशी शंका भाजपच्या इच्छुक नगरसेवकांमधून व्यक्त होते आहे.

सन २०१७ मध्ये भाजपला महापालिकेत प्रथमच एकहाती सत्ता मिळाली. १६२ पैकी त्यांचे तब्बल ९७ नगरसेवक निवडून आले. यात ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांची संख्या तब्बल ४२ होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांतील अनेकांना पक्षात घेत भाजपने त्यांना उमेदवारी दिली. त्याशिवाय युती केलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षातील काहीजणांना त्यांनी ‘कमळ’ हे भाजपचे चिन्ह देऊन उमेदवारी दिली. त्यांच्यातील पाचजण विजयी झाले. पक्षात वरिष्ठ स्तरावरूनच हे प्रवेशाचे निर्णय घेतले गेले. त्यामुळेच अनेकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागला. मिळू शकणाऱ्या उमेदवारीवर पाणी सोडावे लागलेच; शिवाय ज्यांच्याबरोबर सातत्याने राजकीय भांडणे केली, निवडणुकीत त्यांचेच काम करावे लागले.
 

आताही त्याचीच पुनरावृती होईल, अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात शिवसेना पक्षाच्या पाच नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाने सुरू झाली आहे. यावेळी तर निवडणुकीच्या बरेच आधी पक्षप्रवेशाला सुरुवात झाली आहे. २०१७ पासून पुण्यात झालेल्या लोकसभा, विधानसभा अशा सर्व निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळाले. मात्र त्यासाठी अनेक तडजोडी कराव्या लागल्या. फुटीनंतर तयार झालेल्या शिवसेना (एकनाथ शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही पक्षांना भाजपने बरोबर घेतले. महायुती म्हणूनच त्यानंतर भाजपने लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवली. राज्यात लोकसभेला फटका बसला तरी पुण्यात मात्र मोठे यश मिळाले. विधानसभेतही तसेच यश मिळाले. त्यामुळेच आता महापालिकेसाठी भाजपकडे अन्य पक्षांतून येणाऱ्या इच्छुकांच्या संख्येत वाढ झाली आहे. शिवसेनेच्या पाच नगरसेवकांचा पक्षप्रवेशही यातूनच झाला असल्याची चर्चा आहे.

या पाचहीजणांना उमेदवारीचा शब्द देण्यात आल्यानंतरच त्यांचा पक्षप्रवेश झाला असल्याचे बोलले जात आहे. या पाचपैकी चार नगरसेवकांच्या विरोधात भाजपचे उमेदवार अतिशय कमी मतांनी पडले. आता ते नव्याने महापालिकेसाठी तयारी करत होते, तोच मागील निवडणुकीतील त्यांच्या या विरोधकांचा आता थेट भाजपातच प्रवेश झाला आहे. याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस (शऱद पवार) गटातील काही नगरसेवक भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यात प्रामुख्याने उपनगरांमधील नगरसेवकांचा समावेश आहे. त्यांनीही भाजपकडे उमेदवारीचा शब्द मागितला असल्याचे समजते. नगरसेवकांशिवाय शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या पक्षातील काही पदाधिकारीही उमेदवारी मिळत असेल, तर भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी तयार असल्याचे बोलले जात आहे.

भाजपचा हिंदुत्वाचा विचार, पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कामाची पद्धत अनेक राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी यांना आकृष्ट करते. त्यामुळे ते पक्षात प्रवेश करतात. यात मूळचे भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते अस्वस्थ वगैरे होतात, असे अजिबात नाही. उलट पक्षाचा पाया व्यापक होतो, राजकीय शक्ती वाढते. 
- धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप पुणे

Web Title: Shiv Sainik corporators join BJP only after promising to contest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.