- अयाज तांबोळी
डेहणे : खेड तालुक्यातील पश्चिम भागातील शिरूर भीमाशंकर राज्य मार्गावर डेहणे-भोरगिरी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग विसरल्यामुळे व पूर्वीचे खड्डे बुजविताना निकृष्ट दर्जाचे काम याचा परिणाम पावसामुळे असंख्य खड्डे पडले असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था रस्त्यांची झाली आहे. अव्हाट व डेहणे येथे तर रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. पुढाऱ्यांचे नातेवाईक असलेले ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमतामुळे तालुक्यातील अनेक नव्याने झालेल्या रस्त्यांना मुदतीच्या आत खड्डे पडले आहेत.
शिरूर-भीमाशंकर राज्य महामार्गावर भीमाशंकर ज्योतिर्लिंगाकडे जाणाऱ्या वाडा ते भोरगिरी येथील रस्त्यावर पडलेले खड्डे व साईडपट्या भरण्यासाठी गेली. सहा महिने तालुक्यातील पश्चिम भागातील नागरिक सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी व पाठपुरावा करत आले आहेत परंतु अधिकारी या आदिवासी भागाकडे पूर्ण दुर्लक्ष करताना दिसत आहेत. रस्त्यांच्या विकासकामाकडे लोकप्रतिनिधींपासून शासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे ऐकत नसल्याचे चित्र आहे. रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या वरचेवर मलमपट्टी करण्याच्या संयुक्त कार्यक्रमात वाडा रस्त्याची डागडुजी करण्यात आली. मात्र पावसाळ्यात डागडुजीचे पितळ उघडे पडले आणि डागडुजीच्या ठिकाणी पुन्हा खड्डे पडल्याने पुन्हा खड्ड्यातून प्रवास करावा लागला आहे. वाडा ते डेहणे रस्त्याची वाताहात झाली आहे. प्रवाशांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. भीमाशंकर येथे येणारे भाविक तसेच पर्यटकांची वर्दळ कमी असुनही रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
श्रावण महिन्यात भीमाशंकर ला येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. आव्हाट, वाळद तसेच डेहणे परिसरात वाहनांना रस्ता धोकादायक झाला आहे.अनेक पुलांवर खड्डे पडले असून अपघाताची शक्यता आहे. चढपट्ट्या आणि खड्ड्यांमुळे दुचाकी स्वरांचे अनेकदा अपघात झाले असून मोठ्या वाहनांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी एसटी, चार चाकी बंद पडलेल्या अवस्थेत आहेत.निधीच नाही
खेड सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी मात्र निधी नसल्याचे कारण देत मूग गिळून बसले आहेत. नागरिकांची चर्चा तर सोडाच पण साधा फोनही नव्याने आलेले उपअभियंता घेत नाहीत. दुरुस्तीची अनेकदा मागणी करूनही रस्त्याची झालेली प्रचंड दुरवस्था यामुळे नागरिक प्रशासन विरोधात संताप व्यक्त करत आहेत. या रस्त्यामुळे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी ही अधिकारी घेणार का आणि लोकप्रतिनिधी त्यांना जाब विचारणार का हाच प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे.
‘सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना पाऊस कमी पडल्यानंतर त्वरित खड्डे भरून घेण्याच्या सूचना देतो, शिरूर भीमाशंकर राज्य मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग झाल्याने आता फक्त दुरुस्तीच करावी लागेल त्यामुळे साईडपट्ट्या भरण्याचा प्रयत्न करू. रस्त्याचे काम दोन ते तीन दिवसांत करण्याचे आदेश देऊ. - बाबाजी काळे. (आमदार ,खेड तालुका) सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सरपंच परिषद, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान शेठ यांच्या माध्यमातून अनेकदा तक्रारी केल्या आहेत कागदपत्रे माहिती मागितली आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ऐकत नसल्याचे चित्र आहे. पश्चिम भागात रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावे अन्यथा सरपंच परिषद खेड तालुक्याच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याची वेळ येऊ देऊ नये आणि ती जबाबदारी या अधिकाऱ्यांची राहील.- मनोहर पोखरकर (अध्यक्ष ,सरपंच परिषद खेड तालुका.)तालुक्यातील रस्त्याच्या कामांसाठी निधी मिळत नसल्याने व प्रशासनाकडे निधी नसल्याने वेळेवर काम करण्यात अडचण येत आहेत यासाठी वार्षिक दुरुस्ती अंतर्गत निधी देणे गरजेचे आहे आम्ही पाऊस कमी झाल्यानंतर रस्त्याची डागडुजी करू -राम जाधव, सहायक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग खेड.