शेट्टी खून प्रकरणात स्थानिक पोलिसांनी अटक केलेले आरोपीच खरे आरोपी : भाऊसाहेब आंधळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 19:12 IST2018-04-21T19:12:25+5:302018-04-21T19:12:25+5:30
माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी खून प्रकरणात सीबीआयच्या अधिका-याने आम्हाला राजकीय हेतूने अडकवण्याचा प्रयत्न केला. तसेच चुकीच्या मार्गदर्शनामुळे सीबीआयच्या तपासाची दिशा बदलल्याचा आरोप निवृत्त पोलीस निरीक्षक व गुन्हयातील आरोपी भाऊसाहेब आंधळकर यांनी केला.

शेट्टी खून प्रकरणात स्थानिक पोलिसांनी अटक केलेले आरोपीच खरे आरोपी : भाऊसाहेब आंधळकर
पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी खून प्रकरणात सीबीआयच्या अधिका-याने आम्हाला राजकीय हेतूने अडकवण्याचा प्रयत्न केला. तसेच चुकीच्या मार्गदर्शनामुळे सीबीआयच्या तपासाची दिशा बदलल्याचा आरोप निवृत्त पोलीस निरीक्षक व गुन्हयातील आरोपी भाऊसाहेब आंधळकर यांनी केला. तसेच आम्ही अटक केलेले आरोपीच खरे आरोपी असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
नवीन पुरावे मिळत नसल्याचे सांगत केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) याप्रकरणी नुकताच क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. या रिपोर्टमध्ये मला व सहायक निरीक्षक नामदेव कवठाळे यांना क्लीन चीट मिळाल्याचे आंधळकर यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. खून होण्याच्या आठ दिवसपुर्वी सतीश शेट्टी यांनी गुंड विजय दाभाडे आणि त्याची पत्नी रुपाली यांना तडीपार करण्याची मागणी पोलीस अधिक्षकांकडे केली होती. तसचे ते चार महिने विजय व रुपाली दाभाडे यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती घेत होते. त्यामुळे त्यांच्यातील वाद संपला नसल्याचे स्पष्ट होते. मात्र असे असतानाही संदीप शेट्टी यांनी विजय दाभाडे आणि सतीश शेट्टी यांच्यातील वैमनस्य एक वषार्पुर्वीच संपल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात दाखल केले होते. त्याअनुशंगाने सीबीआयने तपास केला. तसेच प्रतिनियुक्ती केलेले अंजीर जाधव यांनी पॉलीग्राफ टेस्ट कायद्याने ग्राह्य नसतानही एका अधिका-याची घरी ती टेस्ट केली. तसेच त्यांनी तपासासाठी दिल्लीवरून आलेल्या टिमला शनिशिंगणापूर व शिर्डीला नेले, असा आरोप आंधळकर यांनी केला. स्थानिक हितसंबंधामुळे राज्यातील पोलीस अधिका-याची प्रतिनियुक्ती घेवू नये, असा नियम आहे. मात्र, तरीही जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. त्याबाबत उच्चन्यायालयात रीट पिटीशन दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेले चार्जशीट पेंडींग
खून करणारा आणि खूनाचा कट रचनारे सापडत नाही म्हणून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नुकताच क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. मात्र पुणे ग्रामीण पोलिसांनी विजय दाभाडे, प्रमोद दत्तात्रय वाघमारे, नवनाथ मारुती शेलार, हनुमंत डोंगरे आणि शाम दाभाडे यांच्या विरुद्ध पुराव्यासह दाखल केलेले दोषारोपपत्र अद्याप पुणे सत्र न्यायालयात पेंडींग आहे. सीबीआयच्या अधिका-याने आम्हाला राजकीय हेतूने अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे माझ्या व कवडाळे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रातून आम्हाला डिस्चार्ज करावे, यासाठी अर्ज केला असून तो सध्या न्यायप्रविष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.