रणचंडीचा अवतार घेत अल्पवयीन बालिकेने रोखला बलात्कार; लाथाबुक्क्यांनी मारहाण करत घडवली अद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 22:01 IST2021-12-29T21:50:06+5:302021-12-29T22:01:41+5:30
घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी काही तासातच पळून जाणाऱ्या या नराधमासह १६ वर्षाच्या मुलाला कात्रज येथून ताब्यात घेतले.

रणचंडीचा अवतार घेत अल्पवयीन बालिकेने रोखला बलात्कार; लाथाबुक्क्यांनी मारहाण करत घडवली अद्दल
पुणे : मैत्रिणीचे प्रेमप्रकरण घरी सांगितल्याने १६ वर्षाच्या मुलाने हात कापून घेतला आहे. त्याचा सलाईन लावले असून खरे खोटे करण्यासाठी त्याने एका १२ वर्षाच्या मुलीला आपल्या रुमवर बोलावून घेतले. तेथे तिला मारहाण करुन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण, या १२ वर्षाच्या मुलीने त्याला सर्व शक्तीनिशी प्रतिकार करत हाताने व लाथा मारुन अंगावरुन खाली पाडले व स्वत:ची सुटका करुन घेतली. या घटनेची माहिती मिळताच हडपसरपोलिसांनी काही तासातच पळून जाणाऱ्या या नराधमासह १६ वर्षाच्या मुलाला कात्रज येथून ताब्यात घेतले.
ही घटना हडपसरमधील काळेपडळ येथे २८ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली. याप्रकरणी १२ वर्षाच्या मुलीने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. प्रशांत ऊर्फ गोट्या प्रकाश थिट्टे (वय २६, रा. तुकाईनगर, काळेपडळ, हडपसर) याला अटक केली आहे. तसेच त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेपडळ येथील १२ वर्षाच्या मुलीला एक १६ वर्षाचा मुलगा तुला मारुन टाकीन, तुला कोयत्याने कापून टाकीन अशी, धमकी देत व या मुलीला त्याचे मेसेज तिच्या मैत्रिणीला देण्यास सांगत असे. प्रशांत थिट्टे याने या मुलीला मंगळवारी सायंकाळी तू या मुलाचे व तुझ्या मैत्रिणीबाबत घरी का सांगितले. त्यामुळे किती प्रॉब्लेम झाला आहे. या मुलाने हात कापला असून तो रडत आहे. त्याला माझ्या रुमवर सलाईन लावले असून त्याचे खरे खोटे करण्यासाठी रुमवर येण्यास सांगितले. तेव्हा तिने नकार दिल्यावर प्रशांत याने तिच्या कानाखाली मारली व तिला जबरदस्तीने रुमवर घेऊन गेला.
मुलीने शक्ती एकटवून प्रतिकार करण्यास सुरुवात केली
दाराची कडी लावून तिला बेडरुममध्ये नेले. तेथे तिच्या अंगाला हात लावू लागल्यावर तिने हरकत घेतल्याने त्याने तिला मारहाण केली. तिला बेडवर ढकलून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न सुरु केला. तेव्हा या १२ वर्षाच्या मुलीने त्याला प्रतिकार करण्यास सुरुवात केली. तिने सर्व शक्ती एकवटून त्याला हाताने व लाथाने मारण्यास सुरुवात केली. लाथा मारुन त्याला अंगावरुन खाली ढकलले. त्यामुळे तो खाली पडला. ही संधी साधून या मुलीने दरवाजा उघडून बाहेर पळ काढला व थेट आपले घर गाठले. तिने आपल्या आईला घडला सर्व प्रसंग सांगितला. तेव्हा आई तिला घेऊन आरोपीच्या घरी जात असताना प्रशांत त्यांना पाहून पळून गेला. तेव्हा त्यांनी हडपसर पोलिसांकडे धाव घेतली. हडपसर पोलिसांना हा सर्व प्रसंग सांगितला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी तातडीने सहायक पोलीस निरीक्षक रत्नदिप गायकवाड, पोलीस अंमलदार बजरंग धायगुडे, गणेश भिसे यांना आरोपीचा शोध घेण्याचा आदेश दिला. गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपीचा शोध घेऊन काही तासातच पळून जाणाऱ्या प्रशांत थिट्टे याला कात्रज परिसरातून पकडले.
प्रसंगात धैर्य कसे शाबूत राखायचे याचा धडाच या मुलीने सर्वांना दिला
मुलींना फसवून त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना नेहमीच होत असतात. अशा वेळी अनेक मुली घाबरुन प्रतिकार करण्याचे विसरुन जातात. पण या १२ वर्षाच्या मुलीने २६ वर्षाच्या नराधमाला प्रतिकार करुन स्वत:ची अब्रु वाचविली व तातडीने घरी सांगून ही बाब पोलिसांपर्यंत पोहचवली. पोलिसांनीही तत्परता दाखवून काही तासातच त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. अशा प्रसंगात धैर्य कसे शाबूत राखायचे याचा धडाच या मुलीने सर्वांना दिला आहे.