मित्रासाठी दिल्ली ‘मॅनेज’ करणारा नेता; पवारांना पंतप्रधान करण्यासाठी सुरेश कलमाडींची धाडसी खेळी
By किरण शिंदे | Updated: January 6, 2026 08:40 IST2026-01-06T08:39:05+5:302026-01-06T08:40:27+5:30
Suresh Kalmadi Death: सुरेश कलमाडी यांनी १९९१ मध्ये शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी दिल्लीत ६४ खासदारांना एकत्र आणलं होतं. वाचा कलमाडींच्या त्या धाडसी राजकीय खेळीचा आणि मैत्रीचा रंजक इतिहास.

मित्रासाठी दिल्ली ‘मॅनेज’ करणारा नेता; पवारांना पंतप्रधान करण्यासाठी सुरेश कलमाडींची धाडसी खेळी
पुणे: पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एका वादळी पर्वाचा अंत झाला आहे. कलमाडी म्हणजे केवळ राजकारणी नव्हे, तर दिल्लीच्या तख्ताला हलवण्याची ताकद ठेवणारा 'किंगमेकर' होता. विशेषतः १९९१ मध्ये त्यांनी आपले मित्र शरद पवार यांना पंतप्रधान करण्यासाठी जी धाडसी खेळी खेळली, ती आजही भारतीय राजकारणातील एक अविस्मरणीय अध्याय मानली जाते.
राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा पेच निर्माण झाला होता. पी.व्ही. नरसिंह राव आणि शरद पवार यांच्यात चढाओढ सुरू होती. अशा वेळी पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले ते सुरेश कलमाडी. रशीद किडवाई यांच्या '२४ अकबर रोड' पुस्तकात नमूद केल्यानुसार, कलमाडींनी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नवनिर्वाचित खासदारांसाठी भव्य मेजवानी दिली. तब्बल ६४ खासदार या डिनरला उपस्थित होते. हा केवळ जेवणाचा कार्यक्रम नव्हता, तर पवारांसाठी केलेले ते एक प्रकारचे 'शक्तिप्रदर्शन' होते.
सोनिया गांधींनाही बसला होता धक्का!
कलमाडींच्या या जबरदस्त नेटवर्किंगमुळे दिल्ली हादरली होती. त्यावेळी सक्रिय राजकारणापासून दूर असलेल्या सोनिया गांधींनाही या प्रकाराची दखल घ्यावी लागली होती. पवारांनी पंतप्रधान व्हावे यासाठी कलमाडींनी दिल्ली 'मॅनेज' करण्याची आपली सर्व ताकद पणाला लावली होती. जरी नंतर समीकरणे बदलली आणि नरसिंह राव पंतप्रधान झाले, तरी कलमाडींनी दाखवलेली ती 'मैत्रीची जिद्द' आजही चर्चेत आहे.
अखेरपर्यंत टिकली मैत्री
राजकारणात गटतट बदलले, तरी पवार आणि कलमाडी यांची मैत्री कधीच तुटली नाही. कलमाडींच्या आजारपणात पवारांनी स्वतः दवाखान्यात जाऊन त्यांची भेट घेतली होती. आज त्यांच्या निधनाने शरद पवारांनी आपला एक विश्वासू 'सारथी' गमावला आहे.