राजीनाम्याचे गौडबंगाल शरद पवार यांनीच सांगावे - किरीट सोमय्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 17:09 IST2023-06-23T17:08:20+5:302023-06-23T17:09:26+5:30
२०२४ ला बारामती लोकसभा मतदार संघात परिवर्तन अटळ

राजीनाम्याचे गौडबंगाल शरद पवार यांनीच सांगावे - किरीट सोमय्या
भोर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राजीनामा देतात आणि पुन्हा माघार घेतात. दुसरीकडे अजित पवार विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन संघटना सांभाळण्याची भाषा करतात. या राजीनाम्यामागे काय गौडबंगाल आहे, हे शरद पवार यांनीच सांगावे. २०२४ ला बारामती लोकसभा मतदार संघात परिवर्तन अटळ असल्याचे प्रतिपादन भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले.
येथील गंगोत्री हाॅलमध्ये नरेंद्र मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सोमय्या बोलत होते.
किरीट सोमय्या म्हणाले, उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना पुणे येथे जम्बो कोविड सेटर संजय राऊत यांचे भागीदार सुजित पाटकर यांना पीएमआरडीएकडून चालवायला दिले. मात्र या कोविड सेंटरमध्ये तीनजणांचा मृत्यू झाला असून, ३२ कोटीपैकी २५ कोटी रुपये सेंटरचालक पीएमआरडीएकडून घेऊन गेले आहेत. या प्रकरणात घोटाळा झाला असून, हा पैसा कोणाकडे गेला? याचा लाभार्थी कोण? याची चौकशी ईडीकडून सुरू आहे. मात्र पुणे पोलिस कधी चौकशी करणार? असा सवाल त्यांनी केला. मुंबई महानगरपालिकेतही कोविड घोटाळा झाला आहे. त्याची चौकशी सुरू आहे. राज्यात २८ घोटाळे बाहेर काढले. त्यांची चौकशी सुरू असून, कोणी जेलमध्ये आहेत, कोणी बेलवर बाहेर आहेत, तर काही प्रकरणे न्यायालयात सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.