"मी मांसाहार केल्याने बाप्पाचे दर्शन नाही घेतले", दगडूशेठचे दर्शन न घेताच शरद पवार परतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 19:57 IST2022-05-27T17:10:35+5:302022-05-27T19:57:33+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट देण्यासाठी आले होते

"मी मांसाहार केल्याने बाप्पाचे दर्शन नाही घेतले", दगडूशेठचे दर्शन न घेताच शरद पवार परतले
पुणे : श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती दर्शनासाठी पवार येणार ही माहिती शहरात पसरताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. आजपर्यंत एकदाही श्रींमत दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनासाठी पवार आले नसताना ते शुक्रवारी आले. पण त्यांनी मंदिरात न जाता, बाहेरूनच मुखदर्शन घेणे पसंत केल्याने नानाविध चर्चेला उधाण आले होते. पण मांसाहार केला असल्यामुळे त्यांनी बाप्पांचे मंदिरा बाहेरूनच मुखदर्शन घेतले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट देणार असल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व नागरिकांनी दुपारी तीनच्या सुमारास मंदिर परिसरात गर्दी केली होती. शरद पवार हे श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जाणार याचेच सर्वांना कुतुहल होते. शरद पवारांनी एकदाही दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतलेले नाही. या नवीन मंदिराची स्थापना झाल्यापासून पवार एकदाही मंदिरात दर्शनासाठी आलेले कुणी पाहिलेले नव्हते. त्यामुळे सकाळपासूनच त्यांच्या या गणेश दर्शनाची चर्चा शहरात रंगली होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास पवार मंदिराकडे आले पण, त्यांनी शिवाजी रस्त्यावर मंदिरासमोर उभे राहून बाप्पांचे लांबूनच मुखदर्शन घेणे पसंत केले. मुखदर्शन घेऊन ते जवळच असलेल्या भिडे वाड्याकडे गेले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माध्यमांशी बोलताना, पवार यांनी मांसाहार केला असल्यामुळे त्यांनी मंदिरात न जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती यावेळी दिली. पवार यांचे मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचे कोणतेही नियोजित नव्हते. त्यांनी केवळ जागेची पाहणी करून, तेथील समस्यांची माहिती घेतली आहे.
शरद पवार यांना विश्वतांनी मंदिरात येऊन दर्शन घेण्याबाबत विचारले होते. पण पवारांनी आपण मांसाहर केला असल्याने मी चुकीचा पायंडा पाडणार नाही. माझ्या बुद्धीला ते पटणार नाही. त्यामुळे मी बाहेरुनच दर्शन घेतो. असे विश्वस्तांना सांगितले असल्याचे जगताप म्हणाले. मंदिराची जागा ही राज्याच्या गृह विभागाची आहे. मंदिराच्या व्यवस्थापनेच्या ट्रस्टचा मान राखून शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे भेटीसाठी आले असल्याचेही जगताप यांनी सांगितले.