भोर : डेहेन गावातील मुरा या धनगरवस्ती येथे मागील पंधरा दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून कुठेच पाणी उपलब्ध नसल्यामुळे तीन किलोमीटरवरून पाणी आणावे लागत आहे. टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी होत आहे.
दिवसेंदिवस उन्हाळा वाढत असून पाणीटंचाई वाढत चालली आहे. वेळवंड खोऱ्यातील डोंगर कपारीत असलेल्या डेहेन-कोडगाव गावातील वस्ती असलेली मुरा या धनगरवाडीत पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. धनगरवस्तीपासून सुमारे तीन किलोमीटरवर असलेल्या विहिरीवर जनावरे घेऊन जाऊन पाणी पाजावे लागत आहे, तर पिण्यासाठी डोक्यावर हांडे घेऊन उन्हातान्हात डोंगराची चढण चढून पाणी आणावे लागत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात येथील नागरिकांना कामधंदा सोडून एकच काम जनावरांच्या पाण्यासाठी, तर महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. त्यामुळे भोर पंचायत समितीकडून टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. दरम्यान मुरावस्ती या धनगरवस्तीत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई झाली असून आठवडाभरात डेहेन गावातही टंचाई भासेल. डेहेन धनगरवस्तीच्या वरती असलेल्या मुरा या ठिकाणी लवकरात लवकर टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी माजी सरपंच संदीप दूरकर यांनी केली आहे.