पुण्यात विक्रीसाठी आणलेला ७० किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 19:16 IST2018-06-30T19:02:59+5:302018-06-30T19:16:02+5:30
गांजा विक्रीचा व्यापार करणा-यांवर कारवाई करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून गेल्या महिन्यापासून शहराला जोडणा-या रस्त्यांवर गस्त सुरू आहे.

पुण्यात विक्रीसाठी आणलेला ७० किलो गांजा जप्त
पुणे : शहरात विक्रीसाठी आणलेला ७० किलो गांजा अंमली पदार्थ विरोधी पथक व हडपसर पोलिसांच्या पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.
विष्णू किसन जाधव ( वय ३४, माळशिरस), अखिला बिपीन नायक (वय २२), सुब्रत सिताकांता नायक (वय २०), पिटर देवराज नायक ( वय २७, सर्व रा, आडावा, ता. मोहाना, जि. गडपती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा गांजा त्यांनी ओरिसामधून पुण्यात आणला असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांजा विक्रीचा व्यापार करणा-यांवर कारवाई करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून गेल्या महिन्यापासून शहराला जोडणा-या रस्त्यांवर गस्त सुरू आहे. गुरुवारी पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, सहाय पोलीस फौजदार शिंदे कर्मचारी व हडपसर पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी दुपारी तीनच्या सुमारास सोलापूर रस्त्यावर राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रासमोर काळ्या रंगाची कार संशयास्पद रित्या उभी असलेली आढळली. पोलिसांना कारमधील चौघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी चौकशी केली आणि कारची झडती घेतली. त्यावेळी कारमधून ४ बँग व १ नायलॉन पिशवीमध्ये एकूण १० लाख ५५ हजार ७१५ रुपये किंमतीचा ७० किलो गांजा मिळून सापडला. पोलिसांनी तो कारसह गांजा जप्त केला आहे. या चौघांवर हडपसर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओरिसातील तिघांनी हा गांजा विष्णू किसन जाधव याच्या सांगण्यावरून आणला असल्याचे त्यांनी सांगितले. तर विष्णू जाधव याच्यावर २०१५ मध्ये गांजा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एम. के. आदलिंग करत आहेत.