CoronaVirus News: कोरोना लशीसाठी ‘सिरम’ने विकला प्रकल्प; एक अब्ज लशी तयार करण्याची क्षमता
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 06:24 IST2020-05-28T23:53:40+5:302020-05-29T06:24:12+5:30
युरोपमधील प्रकल्प

CoronaVirus News: कोरोना लशीसाठी ‘सिरम’ने विकला प्रकल्प; एक अब्ज लशी तयार करण्याची क्षमता
- सुकृत करंदीकर
पुणे : पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने त्यांचा युरोपातील उत्पादन प्रकल्प नोव्हावॅक्स या कंपनीला सुमारे १,२६५ कोटी रुपयांना (१६७ दशलक्ष डॉलर्स) विकला. सिरमकडून विकत घेतलेल्या या प्रकल्पात नोव्हावॅक्स ही कंपनी ‘कोविड-१९’ वरील लशीचे उत्पादन घेणार आहे. युरोपातील झेक रिपब्लिक या देशात असणाऱ्या ‘सिरम’च्या या उत्पादन प्रकल्पाची क्षमता वर्षाला १ अब्ज लशी तयार करण्याची आहे.
लस उत्पादनासाठीच्या अत्यंत अत्याधुनिक सुविधा या १,५०,००० स्क्वेअर फूट क्षेत्रावरील प्रकल्पात आहेत. आता नोव्हावॅक्स या प्रकल्पात सन २०२१ पासून कोविड-१९ वरील लशीचे उत्पादन घेणार आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी ‘लोकमत’ला सांगितले, झेकमधल्या प्रकल्पात आम्ही पोलिओ आणि इतर लशींचे उत्पादन घेत होतो; मात्र या लशीचे पुरेसे उत्पादन घेण्याची क्षमता आमच्या नेदरलँड आणि भारतातील अन्य प्रकल्पांमध्ये आहे. झेकमधील प्रकल्प विकल्याने या उत्पादनावर परिणाम होणार नाही.
सध्या कोविड-१९ वरील लशीचे उत्पादन जगासाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठी नोव्हावॅक्सला उच्चनिर्मिती क्षमतेच्या प्रकल्पाची आवश्यकता होती. युरोप आणि भारतातील अन्य प्रकल्पांमध्ये पुरेशी अत्याधुनिक उत्पादन क्षमता असल्याने झेकमधला प्रकल्प त्यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतला. कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता जगासाठी हे लाभदायक ठरणारे आहे.
- अदर पूनावाला, सीईओ, सीरम इन्स्टिट्यूट
...तर ऑक्टोबरमध्ये लस बाजारात
‘ऑक्सफर्ड’ची ही लस यशस्वी ठरण्याची शक्यता ५० टक्के असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. च्चाचण्या यशस्वी झाल्यास ऑक्टोबरपर्यंत लस बाजारात आणण्याची तयारी ‘सिरम’ने केली आहे. ऑक्टोबरपासून पहिले पाच-सहा महिने दरमहा ५० लाख लशी तयार करण्याचे ‘सिरम’चे नियोजन. च्त्यानंतरही उत्पादन क्षमता १० कोटींपर्यंत वाढवण्याची तयारी.