कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 22:04 IST2025-12-08T21:10:36+5:302025-12-08T22:04:54+5:30
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू हाेते.

कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पुणे : ‘सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर’ ही प्रार्थना जनमानसात रूढ करणारे, समता-न्या-बंधुतेचा जागर करणारे, घराेघरी संविधान पाेहाेचवण्याचा संकल्प केलेले, कष्टकऱ्यांचे नेते, सर्वांचे लाडके बाबा अर्थात डाॅ. बाबासाहेब पांडुरंग आढाव (वय ९५) यांचे आज निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू हाेते.
गेल्या बारा दिवसापासून पुना हॉस्पिटलमध्ये बाबा आढाव यांना रुग्णालयात दाखल केले होते. सुरुवातीला ते उपचारांना प्रतिसाद देत होते. त्यानंतर त्यांची किडनी फेल झाली. आज ८ वाजून २५ मिनिटांनी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झालं. उद्या सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मार्केट यार्ड येथील हमाल भवन येथे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी कुठलीही धार्मिक विधी पार न पाडता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पुण्यात एका सामान्य कुटुंबात १ जून १९३० रोजी बाबांचा जन्म झाला. ते तीन महिन्यांचे असतानाच वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर आजाेळीच ते लहानाचे माेठे झाले. शाळेत असतानाच वयाच्या बाराव्या वर्षी अर्थात १९४२ मध्ये राष्ट्र सेवा दलात दाखल झाले. भाई वैद्य, पन्नालाल सुराणा आणि बापू काळदाते आणि बाबा यांनी एकत्र समाजकार्य केले. साने गुरुजी आणि एस. एम. जोशी हे त्यांचे मार्गदर्शक असल्याने, ते भारत छोडो चळवळ आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सक्रिय सहभागी होते. दलितांना पंढरपूर मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी १९४८ मध्ये झालेल्या आंदोलनात साने गुरुजी यांना बाबांनी मदत केली.
उच्च शिक्षणासाठी ताराचंद रामनाथ आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुढे वैद्यकीय व्यवसायासह सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय सहभाग घेतला. महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या लेखन व कार्यांनी प्रेरित होऊन ते महाराष्ट्रातील संघटित आणि असंघटित कामगार चळवळीत सहभाग घेतला.
वैद्यकीय पदवी मिळवल्यानंतर नाना पेठेत स्वतःचे वैद्यकीय क्लिनिक सुरू केले, ही प्रॅक्टिस त्यांनी १४ वर्षे चालवली आणि नंतर त्यांचा सर्व वेळ आणि संसाधने सामाजिक कार्यासाठी समर्पित केली. दरम्यान, त्यांचे लग्न शीला गरुड यांच्याशी झाले. त्यांना पुढे दोन मुले झाली. बाबा आढाव यांनी अन्नधान्याच्या चढ्या किमतींविरोधात सत्याग्रह केला. यासाठी त्यांना तीन आठवडे तुरुंगवासही भोगावा लागला.
डाॅ. आढाव यांनी नरेंद्र दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती, स्वयंरोजगार महिला संघटनेसाठी अरुणा रॉय आणि नर्मदा बचाओ आंदोलन आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी, पुनर्वसन परिषद यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांसोबत काम केले. आजवरच्या वाटचालीत त्यांना ५३ वेळा तुरुंगवास भोगावा लागला. याच दरम्यान १९६२ मध्ये त्यांनी सरकारी पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे हाेणाऱ्या लोकांच्या विस्थापनाविरूद्ध लढा दिला. या आंदोलनात त्यांच्यावर लाठीचार्ज झाला आणि त्यात त्यांना एका डोळ्याची दृष्टी कायमची गमवावी लागली.
डाॅ.बाबा आढाव यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान म्हणजे हमाल पंचायतीची स्थापना. हमालांच्या सामाजिक प्रतिमेच्या सुधारणेसाठी ही संघटना उभी राहिली. कष्टाची भाकर (कष्टाचे अन्न) या उपक्रमालाही पाठिंबा दिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीसह (१९५६ ते १९६०) गोवा स्वातंत्र्य संग्रामातही (१९४०-१९६१) बाबा सामील झाले हाेते. अस्पृश्यता निर्मूलनाच्या उद्देशाने ‘एक गाव, एक पाणवठा’ उपक्रम हाती घेतला हाेता. मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि देवदासी निर्मूलन परिषदेतही बाबा सामील झाले हाेते. बाबांनी त्यांच्या कौटुंबिक जीवनापेक्षा सामाजिक सक्रियतेला प्राधान्य दिले. धाकट्या मुलाचा जन्म झाला तेव्हाही बाबा घरी वेळ देऊ शकले नाहीत. वयाच्या ९५ व्या वर्षी देखील ‘जिंदाबाद’चा नारा देत विविध प्रश्नांवर आंदाेलन करत राहिले. शरीर थकले, पण बाबांची जिद्द आणि उमेद शेवटपर्यंत कायम राहिली.