ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. आनंदप्रकाश दीक्षित यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 08:46 PM2019-11-05T20:46:35+5:302019-11-05T20:46:59+5:30

मध्ययुगातील साहित्य आणि अभिजात साहित्य या प्रकारात भरीव योगदान दिल्याबद्दल डॉ. दीक्षित यांना साहित्य अकादमीतर्फे भाषा सन्मान प्रदान करण्यात आला होता.

Senior Hindi Literature Dr. Anand Prakash Dixit death | ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. आनंदप्रकाश दीक्षित यांचे निधन

ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. आनंदप्रकाश दीक्षित यांचे निधन

googlenewsNext

पुणे : साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ हिंदीसाहित्यिक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी हिंदी विभाग प्रमुख डॉ. आनंदप्रकाश दीक्षित यांचे (वय ९४) दीर्घ आजाराने मंगळवारी निधन झाले. त्यांच्यामागे चार कन्या आहेत. 
गेल्या महिनाभरापासून डॉ. दीक्षित आजारी होते. काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आजारीदशेतही त्यांनी लेखनाचा ध्यास सोडला नाही.  सध्या एका पुस्तकाचे ते लेखन करीत होते. या पुस्तकाचे लवकर प्रकाशन व्हावे, ही त्यांची इच्छा होती. मात्र, प्रकृतीने साथ न दिल्याने मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे माजी पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 डॉ. दीक्षित यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1925 रोजी उत्तर प्रदेशातील मिरूट येथे झाला.त्यांनी हिंदी आणि संस्कृत या विषयांमध्ये एम. ए. पदवी संपादन केली.हिंदी भाषेमध्ये प्रबंध सादर करून त्यांनी पीएच. डी. मिळविली. साहित्यशास्त्र, सौंदर्यशास्त्र आणि काव्य हे त्यांच्या आवडीचे तर हिंदीसह मराठी, इंग्रजी, बंगाली, गुजराती या भाषांमधील काव्य हे त्यांच्या अभ्यासाचे विषय होते. रस सिद्धांत स्वरूप विश्लेषण,त्रेता : एक अंत:यात्रा , हिंदी रिती-परम्परा विस्मृत संदर्भ ही त्यांची पुस्तके हिंदी साहित्यामध्ये महत्त्वाची मानली जातात. कै. शांतीलाल भंडारी यांच्या महाभारत ग्रंथातील स्त्री व पुरूषांचे समीक्षात्मक मूल्यमापन करणारा भारतायन हा ग्रंथ त्यांनी हिंदीमध्ये लिहिला. मुंबईच्या साहित्य अकादमी तर्फे त्यांना या ग्रंथासाठी उत्कृष्ट अनुवादाचा पुरस्कारही मिळाला. 
मध्ययुगातील साहित्य आणि अभिजात साहित्य या प्रकारात भरीव योगदान दिल्याबद्दल डॉ. दीक्षित यांना नवी दिल्ली येथील साहित्य अकादमीतर्फे फेब्रुवारी २०१७ मध्ये भाषा सन्मान प्रदान करण्यात आला होता. डॉ. दीक्षित हे १९६६ ते १९८५ पर्यंत सावित्रीबाई फुले पुणे विद्याापीठात हिंदी विभाग प्रमुख होते. तर, २०१०पर्यंत ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. हिंदी विभागात त्यांनी  प्रयोजनमूलक हिंदी हा अभ्यासक्रम सुरू केला. 
इंदूर येथील हिंदी साहित्य समितीतर्फे अखिल भारतीय साहित्य पारितोषिक, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे अखिल भारतीय सेवा पुरस्कार, अलाहाबाद येथील हिंदी साहित्य संमेलनात साहित्य वाचस्पती, कानपूर येथील हिंदी साहित्य समितीतर्फे साहित्य भारती, लखनऊ  येथील उत्तर प्रदेश हिंदी संस्थानतर्फे साहित्यभूषण असे मानाचे सन्मान त्यांना यापूर्वी प्रदान करण्यात आले होते. उत्तरप्रदेशमधील हिंदी संस्थेच्या वतीने भाषेतील योगदानाबददल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते डॉ. दीक्षित यांना  भारत भारती सन्मान प्रदान करण्यात आला होता. भारतीय भाषा न्यास संस्थेचे ते संस्थापक- अध्यक्ष होते. 

Web Title: Senior Hindi Literature Dr. Anand Prakash Dixit death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.