Senior citizen call to rejecting concessions | तिकीटासाठी मिळणारी सवलत नाकारण्याकडे ज्येष्ठांची पाठ; रेल्वेच्या आवाहनाला प्रतिसाद नाही

तिकीटासाठी मिळणारी सवलत नाकारण्याकडे ज्येष्ठांची पाठ; रेल्वेच्या आवाहनाला प्रतिसाद नाही

ठळक मुद्देरेल्वेला केवळ ५६ लाख रुपयांचा फायदा झाल्याची माहिती

राजानंद मोरे - 
पुणे : तिकीटासाठी मिळणारी सवलत न घेण्याच्या रेल्वेच्या आवाहनाकडे ज्येष्ठ नागरिकांनी पाठ फिरविली आहे. रेल्वेच्यापुणे विभागामध्ये दि. १ एप्रिल ३० नोव्हेंबर या कालावधीत आठ लाखांहून अधिक प्रवाशांपैकी केवळ १३ हजार ७०० ज्येष्ठ नागरिकांनीच सवलत नाकारत पूर्ण तिकीटावर प्रवास केला आहे. एकुण ज्येष्ठ प्रवाशांच्या तुलनेत हे प्रमाण दोन टक्केही नाही. यातून रेल्वेला केवळ ५६ लाख रुपयांचा फायदा झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
रेल्वेकडून ६० वर्षांपुढील पुरूष प्रवाशांना तिकीट दरात ४० टक्के तर ५८ वर्षापुढील महिला प्रवाशांना ५० टक्के सवलत दिली जाते. ही सवलत गरीब रथ, गतीमान, वंदे भारत, सुविधा व हमसफर या गाड्या वगळून अन्य सर्व गाड्यांमधील सर्व डब्ब्यांमध्ये मिळते. त्यामध्ये मेल, एक्सप्रेस, राजधानी, शताब्दी, जन-शताब्दी, आणि दुरांतो गाड्यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये गॅसचे अनुदान न घेण्याचे आवाहन जनतेला केले होते. त्याला सुरूवातीला चांगला प्रतिसादही मिळाला. याच पार्श्वभूमीवर रेल्वेने जुलै २०१७ मध्ये ज्येष्ठ नागरिकांनाही सवलत न घेण्याचे आवाहन केले. त्यानुसार त्यांना तिकीट काढताना सवलत घेणे व न घेण्याबाबत पर्याय दिले जातात. सवलत नाकारणाऱ्या ज्येष्ठ नागरिक प्रवाशांकडून तिकीटाचे पूर्ण पैसे घेतले जातात. पण रेल्वेच्या या आवाहनला प्रवाशांकडून अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दि. १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०१९ या कालावधीत पुणे विभागातील विविध स्थानकांतून एकुण ८ लाख १० हजार ३४६ ज्येष्ठ नागरिकांनी तिकीट घेतले. त्यामध्ये ७ लाख ९६ हजार प्रवाशांनी सवलत न नाकारता प्रवास केला. तर केवळ १३ हजार ७०० प्रवाशांनी सवलत नाकारत रेल्वेच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. एकुण ज्येष्ठांपैकी हे प्रमाण १.६९ टक्के एवढे आहे. रेल्वेने सवलत घेणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात १९ कोटी ६५ लाख रुपयांची सवलत दिली आहे. तर सवलत नाकारणाऱ्या प्रवाशांकडून केवळ ५६ लाख रुपये मिळाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. 
-------------------
ज्येष्ठ नागरिकांच्या गिव्ह अपची स्थिती
(दि. १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०१९)
                                                 प्रवासी            उत्पन्न (कोटीत)
सवलत नाकारली                    १३,७१४            ०.५६
............
रेल्वेच्या आवाहनला प्रतिसाद नाही
तिकीटावरील सवलत नाकारण्यासाठी प्रवाशांना जबरदस्ती केली जात नाही. तिकीट काढताना त्यांना केवळ पर्याय दिला जातो. त्यांनी सवलत नाकारली तर त्याचा फायदा रेल्वेला होईल. त्यातून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देता येतील, असे रेल्वेतील वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.

Web Title: Senior citizen call to rejecting concessions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.