पोलीस असल्याची बतावणी करुन वृध्दाला पन्नास हजारांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 20:24 IST2018-05-15T20:24:29+5:302018-05-15T20:24:29+5:30
इंदापूर येथे पोलीस अधिकारी असल्यासच सांगत एका वृध्दाला पन्नास हजारांची रोकड लंपास केली.

पोलीस असल्याची बतावणी करुन वृध्दाला पन्नास हजारांचा गंडा
इंदापूर : पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करुन वृध्दाकडील पन्नास हजार रुपये लंपास करणा-या तोतयाविरुध्द आज (दि.१५) इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. परबतराव शाहुराव गायकवाड (वय ७४,रा. सुरवड,ता.इंदापूर) यांनी या संदर्भात इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ठाणे अंमलदार शिरीष लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड यांनी आज इंदापूर अर्बन बँकेतील खात्यामधून १लाख १८ हजार रुपये काढत आपल्या हातातील निळ्या रंगाच्या पिशवीत ठेवले होते. ते तहसील कार्यालयाकडे पायी चालत निघाले असताना बुलेटवरुन आलेल्या एकाजणाने खिशातील ओळखपत्र दाखवत आपण पोलीस असल्याची बतावणी केली. त्यानंतर हातचलाखी करुन फिर्यादी गायकवाड यांच्याकडील निळ्या पिशवीतील पाचशे रुपयांच्या नोटांचा पन्नास हजार रुपयांचा बंडल काढून तो लंपास केला. याप्रकरणी हवालदार रशीद पठाण अज्ञातांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरु केला आहे.