श्रीकिशन काळे -पुणे : उन्हाचा कडाका जाणवू लागला असल्याने पाण्यासाठी माणसांचे, पक्ष्यांचे, प्राण्यांचे हाल होत आहेत. जिल्ह्यातील वन्यजीवांसाठी वन विभागातर्फे पाणवठे, टॅँकरची सोय करण्यात आलेली आहे. प्रत्येक तालुक्यात सुमारे तीनशे पाणवठे वन विभागातर्फे तयार केलेले आहेत; तसेच ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता नाही, तिथे टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. काही स्वयंसेवी संस्था, तरुण मुले-मुली, ग्रामपंचायतदेखील त्यासाठी मदत करीत आहेत. उन्हामुळे झाडे वाळून जाऊ नयेत म्हणून अनेक वृक्षप्रेमी आणि स्वयंसेवी संस्था आपापल्या भागात झाडांना पाणी देण्याचे काम करत आहेत. अनेक टेकड्यांवर अशी कामे होत आहेत. वन विभाग प्रत्येक ठिकाणी काम करू शकत नाही. त्यांच्याकडे मनुष्यबळही खूप नसते. म्हणून नागरिकांनीदेखील त्यांना सहकार्य करून झाडांची तहान भागविली पाहिजे. दिघी येथील दत्त गडावर गेल्या अनेक वर्षांपासून ‘अविरत श्रमदान’ या संस्थेतर्फे झाडांची निगा राखली जात आहे. २०१७ पासून या ठिकाणी झाडं लावून त्यांना नियमित पाणी देण्याचे कामही संस्था करीत अहे. सुमारे साडेतीन हजार झाडे येथे हिरवाईने फुलली आहेत. यासाठी संस्थेचे सचिन लांडगे, सुनील पाटील, डॉ. नीलेश लोंढे, जितेंद्र माळी, विश्वजित डोंगरे, अॅड. सुनील कदम, संदीप पाटील, धनाजी पाटील आदी काम करीत आहेत. रोज सकाळी साडेसहा ते साडे आठ या वेळेत पाणी दिले जाते. पक्ष्यांसाठी खाण्याची सोयदेखील केली आहे, अशी माहिती धनाजी पाटील यांनी दिली. .........
वनराई जगविण्यासाठी राबतेय ज्येष्ठ अन् तरुणाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 11:44 IST
पाण्यासाठी होत आहेत माणसांचे, पक्ष्यांचे, प्राण्यांचे हाल
वनराई जगविण्यासाठी राबतेय ज्येष्ठ अन् तरुणाई
ठळक मुद्देवन विभागाकडून तयारी; स्वयंसेवी संस्था, शेतकऱ्यांची होतेय मदत