तुझ्यासाठी परदेशातून महागडे गिफ्ट पाठवतो सांगून गृहिणीला साडेसहा लाखांचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Updated: October 22, 2023 16:10 IST2023-10-22T16:10:01+5:302023-10-22T16:10:41+5:30
तक्रारदार महिलेची गिल्बर्ट अँड्र्यू नावाच्या व्यक्तीसोबत फेब्रुवारी २०२२ मध्ये सोशल मीडियावर ओळख झाली होती

तुझ्यासाठी परदेशातून महागडे गिफ्ट पाठवतो सांगून गृहिणीला साडेसहा लाखांचा गंडा
पुणे: परदेशातून गिफ्ट पाठवले असल्याचे सांगून एका गृहिणीची फसवणूक केल्याचा प्रकार कोंढवे धावडे परिसरात घडला आहे. याबाबत एका ४४ वर्षीय महिलेने पोलिसांना फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे हा प्रकार फेब्रुवारी २२ ते शनिवार (दि. २१) यादरम्यान घडला आहे.
तक्रारदार महिलेची गिल्बर्ट अँड्र्यू नावाच्या व्यक्तीसोबत फेब्रुवारी २०२२ मध्ये सोशल मीडियावर ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यावर गिल्बर्टने महिलेचा नंबर मागितला. त्यानंतर दोघांमध्ये रोज संभाषण होऊन मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. काही कालांतराने तक्रारदार महिलेसाठी महागडे वस्तू गिफ्ट म्हणून पाठवत असल्याचे सांगितले. त्यांनतर डिलिव्हरी एजंटचा नंबर देऊन महिलेला क्लिअरन्स फी, कस्टम चार्जेस, लोकल फ्लाईट तसेच हॉटेल बिल अशी वेगवेगळी कारणे सांगून महिलेकडून एकूण ६ लाख रुपये उकळले. महिलेला संशय आल्याने यासंदर्भात विचारपूस केली असता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनतर तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत झालेल्या प्रकारचा जबाब नोंदवला. याप्रकरणी गिल्बर्ट अँड्र्यू याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक शबनम शेख पुढील तपास करत आहेत.